
>> गणेश आचवल
टीव्ही मालिकांतून घराघरात पोचलेला अभिनेता म्हणजे सौरभ चौघुले. अभिनेता म्हणून जबाबदारीचे भान आणि आपण सतत काही ना काहीतरी नकीन शिकत राहावे हा त्याचा ध्यास! माणसं जोडण्याकरचा दृढ विश्वास… एक प्रोमिसिंग चेहरा!
सध्या कलर्स मराठीवर ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका खूप लोकप्रिय आहे. यामध्ये मल्हार ही प्रमुख भूमिका करणारा अभिनेता म्हणजे सौरभ चौघुले.
सौरभ मुळात डोंबिवलीकर. त्याने बी. टेक. ही पदवी कर्नाटक विद्यापीठातून संपादन केली आहे. तसेच फिल्म मेकिंगचा डिप्लोमादेखील पूर्ण केला आहे. कॉलेजमध्ये असतानादेखील डोंबिवलीतील विविध नाटय़ संस्थांमधून तो अभिनय करत होता. तो कॅमेरा शिकला होता. कल्चर मशीन यूटय़ूब चॅनेलसाठी त्याने काही व्हिडीओज शूट केले होते. लक्ष्य, क्राईम डायरी, गर्जा महाराष्ट्र अशा काही एपिसोडिक मालिकांत त्याने भूमिका केल्या. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’मध्येसुद्धा त्याने काम केले होते. ‘मीटर डाऊन’ या वेब सीरिजमध्ये सौरभची प्रमुख भूमिका होती. असे सगळे चालू असतानाच लॉकडाऊन झाला. या लॉकडाऊनमध्येच ‘शुद्ध देसी मराठी’ नामक एका चॅनलला होस्टची गरज होती आणि मग सौरभ होस्ट म्हणूनदेखील आपल्या समोर आला.
‘जीव माझा गुंतला’मध्ये ‘मल्हार’ ही भूमिका त्याला मिळाली आणि त्याच्या चेहऱयाला खऱया अर्थाने ओळख मिळाली. तो म्हणतो, या भूमिकेसाठी मला कोल्हापूरला राहावे लागणार होते. आईबाबांचा मला खूप सपोर्ट मिळाला. डेली सोपमध्ये काम करणे आणि तेसुद्धा प्रमुख व्यक्तिरेखेत, हे खूप आव्हानात्मक असते. ‘जीव माझा गुंतला’ने मला घराघरांत पोचवले. आज कुठे मॉलमध्ये खरेदीला गेलो किंवा कुठे इव्हेंटला गेलो की, लोक आवर्जून सेल्फी काढतात. तेव्हा खूप वेगळे वाटते. आईबाबा जेव्हा मला म्हणाले की, आम्हाला तुझा अभिमान आहे, तो माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे, असे मी सांगेन.
सौरभला माणसे जोडायची आवड आहे. चाहते आपल्यावर खूप प्रेम करत असतात आणि त्यामुळे आपल्यावर एक अभिनेता म्हणून मोठी जबाबदारी असते, असे सौरभ मानतो. आपण सतत काही ना काहीतरी नवीन शिकत राहावे आणि हा दृष्टिकोन आपल्या आयुष्यात महत्त्वाचा आहे, असे तो सांगतो.


























































