
महाराष्ट्रातील गद्दारीचा पॅटर्न आता इतर राज्यांत देखील जाऊ लागला आहे. त्यामुळे देशात अस्थिरता निर्माण होऊ शकते. यामुळे कोणताही राजकीय पक्ष सध्या आनंदात नाही. या 40 आमदार आणि 12 खासदारांना कधीतरी जनतेसमोर जावंच लागणार आहे. आणि जनता यांना यांचा निकाल देणार आहे. राज्यात सरकार स्थापन होऊन 33 दिवस उलटून गेले आहेत. खरा मुख्यमंत्री कोण, हा प्रश्न महाराष्ट्राला अजूनही पडलेला आहे. या सरकारच्या मंत्रीमंडळात दोन जणांचं जम्बो कॅबिनेट आहे. मात्र यांना अजूनही तिसरा माणूस सापडलेला नाही. असा टोला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे. मंगळवारी आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर असताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते.
यावेळी ते म्हणाले की निष्ठा यात्रेला जनतेचे प्रेम मिळत आहे. प्रत्येक जण सांगत आहे की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. कोणालाही गद्दारी आवडलेली नाही. हा कोणताही राजकीय दौरा नसून मी प्रामाणिकपणे लोकांना भेटत आहे. लोकांचे प्रेम घेण्यासाठी हा दौरा मी काढला आहे. शिवसेनेला आणि ठाकरे घराण्याला एकट पडण्याचा कट 40 गद्दारांनी रचला होता. आताही त्यांचा आम्हाला एकटे पडण्याचा पुरेपूर प्रयत्न चालला आहे. मात्र जनतेचं मिळत असलेलं प्रेम लक्षात घेता जनता आम्हाला एकटं पडू देणार नाही याची मला खात्री आहे.
उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे. आदित्य ठाकरेंवर आमचं प्रेम आहे, ते आम्हला मुलासारखे आहेत असे बंडखोर म्हणत होते. एक महिन्यापासून त्यांचं नाटक सुरु होतं. मात्र यांच्या मनात खरं काय चाललं होतं हे आता लोकांच्या समोर येऊ लागलं आहे. जे आता पर्यंत स्वतःला शिवसेना म्हणत होते. आता यांचा खरा चेहेरा बाहेर येतोय. परंतु गद्दार हा गद्दारच असतो. ते त्यांच्या भ्रमात आहेत मात्र हे सरकार कोसळणार हे आपण लिहून घ्या. असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
जिथे जिथे मी पर्यावरणाच्या विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी निधी दिला होता त्याला या सरकारने स्थगिती दिली आहे. आदिवासी विकास खात्यातील जीआरला देखील स्थगीती मिळाली आहे. यातून महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. स्थगिती द्यायला किंवा नवीन जीआर आणायला या सरकारची नक्की कायदेशीर स्थिती काय आहे. हे सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर सरकार आणि दोन माणसांच मंत्रिमंडळ हे काळजीवाहू आहे. पुढील अडीच वर्षे ते आमच्यावरच खापर फोडतील. कोणाच्या मनात कसला राग आहे हे सांगता येत नाही. यांना जास्त दिलं आणि जास्त विश्वास ठेवला म्हणून आमच्यावर एवढा राग आहे का? हे कळत नाही. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
नवी मुंबईत आम्ही तिरुपती बालाजीचे मंदिर आणणार होतो. अयोध्येत महाराष्ट्र भवन व्हाव यासाठी उत्तरप्रदेश सरकारला आम्ही विनंती केली होती. महाराष्ट्रातील 10 प्राचीन मंदिरांना आम्ही निधी दिला होता. अजून 10 मंदिरांचा त्यात समावेश होणार होता. हे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते तर या मंदिरांसाठी त्यांनी काय केलं हे पाहणे महत्वाचे ठरेल असे आदित्य ठाकरे म्हणाले.





























































