
बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या 44व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी वेटलिफ्टर्सनी आपला दबदबा कायम राखला आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी हिंदुस्थानी वेटलिफ्टर विकास ठाकूरने 96 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. हे हिंदुस्थानचे एकूण 12वे तर वेटलिफ्टिंगमधील आठवे पदक ठरले आहे.
विकासने स्नॅच फेरीत 155 किलो आणि क्लीन अँड जर्क फेरीमध्ये 191 किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण 346 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. सामोआचा वेटलिफ्टिंगपटू डॉन ओपालॉग विकासच्या पुढे होता. त्याने एकूण 381 किलो वजन उचलले. या वजनासह ओपलॉगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रमही नोंदवला आहे. 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत हिंदुस्थानी वेटलिफ्टर्सनी जोरदार कामगिरी केली आहे. मीराबाई चानू, जेरेमी लालनीनूंगा आणि अचिंत शेउली यांनी स्वर्ण, संकेत महादेव सरगर, बिंदियारानी देवी आणि विकास ठाकूर यांनी रौप्य, तर गुरुराजा ठाकूर आणि हरजिंदर कौर यांनी कांस्यपदक पटकावले आहे.





























































