उदय सामंत यांना जमावाचा हिसका; गद्दार…गद्दार…घोषणाबाजी करीत फोडली मोटार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंडखोर आमदार उदय सामंत यांना आज जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्या मोटारीवर जमावाने मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कात्रज चौकात हल्ला करीत काच फोडली. उदय सामंत गद्दार..गद्दार अशा जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

घटनास्थळी पोलिसांनी तत्काळ धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका कार्यक्रमासाठी कात्रज भागात आले होते. यावेळी जमावाने कात्रज चौकात सामंत यांची मोटार अडवून काच फोडून चांगलाच हिसका दाखविला. जमावाने सामंत यांच्या मोटारीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीने सामंत यांच्या मोटारीला वाट करून दिली. याप्रकरणी  कोथरूड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.