
शिवसेनेत बंड झाल्यापासून दररोज निष्ठावंत शिवसैनिकांची मातोश्रीवर गर्दी होत आहे. बुधवारी देखील जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री येथे आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आधी शिवसेना फोडण्याचे प्रयत्न व्हायचे आता शिवसेना संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले.
मातोश्रीच्या बाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. ”राजकारणात हार जीत होत असते पण संपविण्याची भाषा आपल्या देशात कधीही राजकारणात झालेली नव्हती. आपली लढाई दोन तीन पातळीवर सुरू आहे. पहिली रस्त्यावरची लढाई ज्यात आपण कमी पडणारच नाही. दुसरी कोर्टात तिची सुनावणी आता सुरू आहे ती आणि तिसरी लढाई तेवढीच महत्त्वाची आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे येण्यापेक्षा जिथे आहात तिथे पाय रोवून उभे रहा. ती लढाई आहे शपथपत्राची. हा विषय फार गंभीर आहे. असा उडत उडत घेऊ नका. आपली कायद्याची लढाई सुरू आहे. आपले वकील एकीकडे किल्ला लढवत आहेत. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. आजपर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले मात्र आता शिवसेनेला संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी परवा तसं बोलूनही दाखवलं आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘मात्र शिवसेना कधी संपणार नाही. अनेकांनी असे प्रयत्न करून पाहिले पण यशस्वी झाले नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.























































