
गणेशोत्सव सुरू होण्यास अवघ्या महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला असताना पालिकेकडे आतापर्यंत केवळ 1249 मंडळांनीच परवानगीसाठी अर्ज केले आहेत. यातील 500 जणांना परवानगी देण्यात आली असून आवश्यक कागदपत्रांअभावी 102 अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून असणारे कोरोनाचे संकट या वर्षी नसल्यामुळे गणेशोत्सव धूमधडाक्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच गणेशोत्सव सुरू होण्यास अवघा महिनाभराचा कालावधी राहिल्यामुळे मंडळांकडून मंडप बांधणे, सजावट करण्यास सुरुवातही झाली आहे. मोठय़ा मंडळांकडून गणेशोत्सवाआधी काही दिवस गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जात असल्यामुळे परवानगीसाठी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. मुंबईत 12 हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांना दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी वाहतूक पोलीस, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस ठाण्यांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र गणेश मंडळांची गैरसोय दूर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने विविध प्राधिकरणांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू केली आहे.
आतापर्यंतची स्थिती
आलेले एकूण अर्ज 1249
दुबार आलेले अर्ज 138
परवानगी दिलेली संख्या 503
अर्ज फेटाळले 102
प्रक्रियेत असणारे अर्ज 506
अशी मिळवा परवानगी
पालिका पोर्टलवर-नागरिकांकरिता टॅब-अर्ज करा (गणेशोत्सव/नवरात्रोत्सव) या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. यासाठी https://portal.mcgm.gov.in या वेबसाइटवर मराठी, इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.
ज्या गणेशोत्सव मंडळांना गेल्या वर्षी परवानगी दिली असेल त्या मंडळांनी पालिकेकडे अर्ज पाठवावा. त्या मंडळांना त्वरित परवानगी देण्यात येईल.त्यासाठी गेल्या वर्षी दिलेल्या परवानगीचा क्रमांक अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.



























































