दोन महिन्यांनंतरही ओढे, नाले कोरडेच; पंढरपूर तालुक्यात पावसाची हुलकावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रावण महिना सुरू झाला तरी पंढरपूर तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अद्यापही विहिरींनी तळ गाठलेलेच आहेत. तर ओढे, नालेदेखील कोरडेच पडलेले आहेत. दमदार पाऊस झालेला नसतानादेखील पाऊस पडेल या आशेवर शेतकऱयांनी खरीप हंगामातील 90 टक्के पेरण्या पूर्ण केल्या आहेत. पेरणी केलेल्या पिकांची उगवण चांगली झाली असली तरी त्याला पाण्याची गरज भासू लागली आहे. त्यामुळे शेतकऱयांचे डोळे आकाशाकडे लागले असून, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पावसाळ्याचे सुरुवातीचे दोन महिने निघून गेले. पाऊस आला आला अन् गेला, असे चित्र दिसून येत होते. सध्यादेखील श्रावण महिना सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. मात्र, श्रावण महिन्यात पाऊस पडेल, अशी शेतकऱयांना आशा आहे. मागील वर्षाचा अनुभव पाहाता शेतकऱयांनी मोठय़ा धाडसाने खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. याकरिता बी-बियाणे, खते, औषधे यावर शेतकऱयांनी मोठा खर्च केला आहे. परंतु पाऊस लांबत चालल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आठवडाभरात पाऊस पडला तरच पेरणी केलेली मका, तूर, उडीद, सूर्यफूल आदी पिके वाचू शकतात; अन्यथा शेतकऱयांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात या दिवसात पावसाच्या पाण्याने ओढे, नाले भरून वाहत असतात. मात्र, यंदा पाऊस लांबला आहे. जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱयांची निराशा केली आहे. त्यामुळे ओढे, नाले कोरडे पडलेले आहेत. तर, विहिरींनीदेखील तळ गाठलेला आहे. माळरानावरील विहिरी अद्यापही कोरडय़ाठाक पडलेल्या आहेत. त्यामुळे विहिरीत पाणी नसलेल्या शेतकऱयांनी खरिपाच्या पेरण्या अद्यापि केलेल्या नाहीत.

कालव्याच्या पाण्याचाच एकमेव आधार

पाऊस समाधानकारक झालेला नाही. त्यामुळे विहिरी अद्यापही कोरडय़ा पडलेल्या आहेत. तर बोअरवेलचे पाणी फळबागांना द्यावे लागत आहे. यामुळे खरिपाची पेरणी केलेल्या पिकांना एकतर पावसावर अवलंबून राहावे लागणार आहे. पाऊस लांबला तर नीरा उजवा कालवा, उजनी डावा व उजवा कालव्यास येणाऱया आवर्तनाचाच शेतकऱयांना आधार मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱयांकडून नीरा उजवा, उजनी कालवा विभागाकडे पाणी मागणी अर्ज करू लागले आहेत.

हलक्या पावसामुळे तणनाशकाचा खर्च वाढला

पाऊस आलाच तर हलका ते मध्यम स्वरूपाचा येतो. या पावसामुळे जमिनीत ओल तयार होत नाही. या उलट रिमझिम पावसामुळे शेतात गवत, तण जास्त वाढत चालले आहे. यामुळे शेतकऱयांना सातत्याने जमिनीची मशागत करावी लागत आहे. तर, पेरणी केलेल्या पिकांमध्ये तणनाशकाची फवारणी शेतकऱयांकडून केली जात आहे.