Repo Rate कर्ज पुन्हा महागले, रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागाई शिखरावर असताना सर्वसामान्य लोकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणखी एक धक्का दिला. आरबीआयने आज नवीन पतधोरण जाहीर करत रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. रेपो रेट अर्धा टक्क्यांनी वाढल्यामुळे तो 5.40 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे कर्ज पुन्हा महागणार असून कर्जाचे हप्तेही वाढणार आहेत.

विकसीत देशांमध्ये सध्या मंदीचे वारे वाहू लागले आहे. कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही वाढ होतेय. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक पातळीवर घसरण झाली आहे. त्यामुळे महागाई वाढलेली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याआधी जून महिन्यात नवीन पतधोरण जाहीर केले होते. आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची वाढ केली होती. त्यामुळे रेपो रेट 4.40 वरून 4.90 वर पोहोचला होता. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेने महिन्याभरात दुसऱ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. मे महिन्यात 4 तारखेला आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अचानक पत्रकार परिषद घेत रेपो रेट 0.40 टक्क्यांनी वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली होती. वाढत्या महागाईवर तोडगा म्हणून कर्जे महाग केल्याचे शक्तीकांत दास यांनी म्हटले होते.

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणे म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.