मनतरंग – ताण टणाटण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

सर्वप्रथम सकारात्मक ताण हा ओळखण्यास एकदम सोपा आहे. ज्यावेळेस आपल्या आयुष्यात बदल होताना तो हवाहवासा वाटतो, तो बदल घडताना आनंद होत असतो. त्या बदलासोबत काम करायला आपण स्वतः हिरीरीने सहभागी होतो तेव्हा तो सकारात्मक ताण उत्पन्न करत असतो. कारण त्यावेळी आपली कितीही ताण सहन करण्याची क्षमता वाढलेली असते. आपण त्याही परिस्थितीत आनंदी असतो. स्वतःला उत्साही ठेवतो. कारण आपल्याला हे सगळे हवे असते.

आज सौरभ (नाव बदलले आहे) सकाळपासूनच टेन्शनमध्ये होता. त्याचे त्यालाच कळत नव्हते की त्याला कसले टेन्शन येत होते. त्याच्या आयुष्यात खरं तर चांगल्या गोष्टी घडू लागल्या होत्या. परदेशात नोकरीच्या निमित्ताने त्याचे जाण्याचे फायनल झाले होते. सौरभच्या आईवडिलांना जेव्हापासून ही गोष्ट कळली होती तेव्हापासून त्यांना कोण आनंद झाला होता. दुसरीकडे सौरभसुद्धा भरपूरच खूश होता. त्याची त्याच्या कंपनीतली दोन वर्षांची मेहनत जणू फळाला आली होती.

परदेशात जाण्याचे कंपनीकडून ऐकल्यावर सुरुवातीचे काही दिवस सौरभचे मजेत गेले. मात्र जसजसा त्याच्या जाण्याचा दिवस जवळ येऊ लागला तसतसा सौरभ गप्प राहू लागला. त्याचा जास्तीत जास्त वेळ तो ज्या ठिकाणी जाणार होता त्याची माहिती काढण्यात जाऊ लागला. ‘मला त्या ठिकाणी ऍडजस्ट होता आलं नाही तर?’ असे काहीसे त्याच्या मनात विचार येऊ लागले. त्याचे कशातही मन आता रमत नव्हते. गेले चार-पाच दिवस तर तो शांत झोपलाही नव्हता. धड खात-पित नव्हता की कोणाशी धड बोलत नव्हता. त्याचा सगळाच खर्च कंपनीकडून होणार होता. तरीही त्याला तिकडच्या राहणीमानाचीही थोडीफार चिंता वाटत होती. त्या विचारांच्या द्वंद्वामध्येच सौरभने समुपदेशन घेण्याचे ठरवले.

‘मॅडम, मला आता मला पाहिजे तशी संधी चालून आली आहे. मी खरं तर टेन्शन फ्री असायला पाहिजे. सगळ्या माझ्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं आहे हे. पण मी जाम नर्व्हस झालो आहे. नक्की जाऊ की नको? माझ्याकडून सगळं व्यवस्थित मॅनेज होईल ना? हे असे विचार सध्या येतात माझ्या डोक्यात. समजा मी तिथल्या वातावरणाला ऍडजस्ट झालो नाही तर? मला अर्धवट यावं लागलं तर? मला कोणी नवीन मित्र नाही बनवता आले तर?’ सौरभ भरपूर बोलत होता. त्याच्या प्रत्येक विचाराला तो व्यवस्थितपणे शब्दांत उतरवत होता. त्याच्या मनातली अस्वस्थता स्पष्टपणे बोलून दाखवत होता.
त्याची ही अवस्था नक्कीच ताणाची होती. पण त्याचा हा ताण ‘सकारात्मक ताण (Eustress)’ होता.

आता तुम्हा सर्वांना नक्कीच प्रश्न पडला असेल की, सौरभला आलेला ताण हा सकारात्मक कसा असू शकेल? आपली नक्कीच वाचण्यात काहीतरी गल्लत होते आहे का? नक्कीच नाही.

ताण हा सर्वांनाच नकोसा वाटतो. मग हा सकारात्मक ताण म्हणजे नक्की काय? तो सगळ्यांनाच येतो का? मग यात आणि नकारात्मक ताणात (Distress) फरक तो काय?

सकारात्मक आणि नकारात्मक ताणामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. सकारात्मक ताण (Eustress) म्हणजे काय? तर याचा अर्थ साध्या-सोप्या भाषेत सांगायचा झाला तर जेव्हा ताण हा आपल्यामध्ये एकप्रकारची ऊर्जा आणि उत्साह निर्माण करतो, ज्या ताणावेळी आपल्याला कुठलेही शारीरिक श्रम जाणवत नाहीत त्या ताणाला ‘सकारात्मक ताण’ असे म्हटले जाते.

याउलट नकारात्मक ताण (Distress) असतो ज्यात आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती सकारात्मक ताणाच्या अगदी उलट असते. आपल्याला ती घटना किंवा तो प्रसंग नकोसा वाटतो किंवा मग तो प्रसंग अनुभवताना जास्त थकून जायला होते. त्या प्रसंगातून जात असताना आपल्याला दडपण आल्यासारखे होते आणि आपण असा नकारात्मक ताण सहन करू शकत नाही.

सकारात्मक ताण अनुभवताना आपल्यामध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतच असतात. जसे की, छातीत धडधडणे, बरेचसे विचार येणे, थोडीफार भीती वाटणे. पण हे सर्व काही काळापुरतेच मर्यादित असते.

सकारात्मक ताणाचे उदाहरण द्यायचे झाल्यास लग्न होणे, नवीन नोकरी, परदेशात जाण्याची संधी अशा काही आयुष्यातील आनंद उत्पन्न करणाऱया घटनांचा समावेश करता येईल. या घटना आपल्याला आनंद, उत्साह देऊन जातात ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त मन लावून त्या गोष्टी करत असतो. हे सर्व करताना आपण जरी थकलेलो असलो तरी आपल्याला त्या श्रमांचे काहीही वाटत नाही.
सौरभ हेच सर्व जरी अनुभवत असला तरी त्याला ही ताणाची दुसरी बाजू अजिबातच माहीत नसल्यामुळे तो आणि त्याचे कुटुंबीय गोंधळून गेले होते.
आपल्या आजूबाजूसदेखील सौरभ आणि त्याच्या आईवडिलांसारख्या व्यक्ती आहेत ज्यांना दोन्ही ताणांमधला फरक न कळल्यामुळे सकारात्मक ताण आल्यास त्याचे नियोजन कसे करायचे हे माहीत नसते आणि बऱयाचदा या ताणाला नकारात्मक समजले जाते आणि त्याचे फायदेही समजले जात नाहीत.
सर्वप्रथम सकारात्मक ताण हा ओळखण्यास एकदम सोपा आहे. ज्यावेळेस आपल्या आयुष्यात बदल होताना तो हवाहवासा वाटतो, तो बदल घडताना आनंद होत असतो. त्या बदलासोबत काम करायला आपण स्वतः हिरीरीने सहभागी होतो तेव्हा तो सकारात्मक ताण उत्पन्न करत असतो. कारण त्यावेळी आपली कितीही ताण सहन करण्याची क्षमता वाढलेली असते. आपण त्याही परिस्थितीत आनंदी असतो. स्वतःला उत्साही ठेवतो. कारण आपल्याला हे सगळे हवे असते.

सकारात्मक ताण आल्यास सर्वात प्रथम आपल्याला डोकं शांत ठेवून या ताणाला सामोरं कसं जायचं हे पाहायचं असतं. सोप्या शब्दात मांडायचे झाल्यास अति विचार न करता त्या गोष्टीचा / घटनेचा अनुभव घ्यायचा असतो. मगच जास्तीत जास्त ती घटना आपल्याला आनंद देऊ शकते.

सकारात्मक ताणाच्या प्रसंगामध्ये इतरांनाही सामील करून घेतल्यास ती घटना किंवा प्रसंग अधिकाधिक आनंददायी होऊ शकतो.

सौरभला आता बऱयाच गोष्टी कळल्या होत्या आणि छान वळल्याही होत्या. त्याला सगळ्यात आधी एका गोष्टीची गंमत वाटली होती ती म्हणजे त्याला आलेला ताण हा सकारात्मक होता आणि त्यामुळेच तो आता शांत झाला होता.

त्याच्या मनातील खळबळीला आता नेमकं उत्तर सापडलं होतं. तो आता जास्तीत जास्त सकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्या आयुष्यातील सगळ्याच ताणांना सामोरा जाणार होता.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
– [email protected]