गिरगावचा शाहरुख..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संदेश भट ( नाट्य निर्माते)

आमच्या सुयोगचा अत्यंत जवळचा नट गेला. मोरूची मावशी हे जसे प्रदीपचे पहिले नाटक होते तसेच सुयोगचेही पहिलेच नाटक होते. आम्ही मावशीचे २००० प्रयोग केले. पुढे अनेकांनी नाटक सोडले.. पण प्रदीप हा एकमेव कलाकार होता, जो मावशीच्या पहिल्या प्रयोगापासून ते शेवटच्या प्रयोगापर्यंत सातत्य राखून होता. प्रदीप खऱ्या अर्थाने नाटकवाला.. नाटकवेडा.. होता! आता नाटकाचे १०० प्रयोग झाले की त्याची जाहिरात होते. पण आमचे हे सगळे कलाकार मावशीचे महिन्याला १०० प्रयोग करायचे. मावशीच्या प्रयोगाची सुरुवातच प्रदीपच्या गाण्याने आणि नाचण्याने व्हायची. आणि प्रेक्षकांना त्याचा नाच प्रचंड आवडायचा. मावशीचे प्रेक्षक नाटक पाहायला यायचेच पण त्याहीपेक्षा ते प्रदीपला पाहायला यायचे. कारण रुबाबदार.. देखणा प्रदीप त्यांना त्यांच्यातीलच एक वाटायचा. त्याचा मिश्कील आणि वात्रट भैय्या सगळ्यांनाच खूप आवडायचा. त्याची अशी स्वत:ची खास हेअरस्टाईल होती. मधून भांग पाडण्याची. शेवटपर्यंत त्याने ती हेअरस्टाईल तशीच ठेवली.

प्रदीप हरहुन्नरी होता. नाचाची त्याला विशेष आवड. सगळ्या माध्यमात तो तितक्याच सहजपणे वावरला.. पण त्याचे खरे क्षेत्र नाटकच होते. तो खऱ्या अर्थाने नाटकवाला होता. मुळात खूप कमी नटांना हे उमगते की कोणते क्षेत्र त्यांच्यासाठी चपखल आहे. प्रदीपने स्वत:चे खेत्र बरोबर जोखले होते. त्यामुळे चित्रपट. मालिका करूनही तो स्थिरावला.. आणि त्याचे पहिले प्रेम नाटक हेच होते. यश मिळवणे खूप सोपे असते. पण ते पचवणे खूप अवघड असते. प्रदीपला ते लीलया जमले. म्हणूनच त्याचा देखणा चेहरा सर्वसामान्यांचा चेहरा होता. त्याच्या गिरगावातील झावबा वाडीचा तो शाहरुख होता. त्याला पाहायला सारी तरुणाई गोळा व्हायची. तो त्यांना त्यांच्या वयाचा वाटायचा.
मोरूची मावशी हा विजय, प्रशांत, प्रदीप यांचा अस्सल जमलेला मुरांबा होता. पण तरीही भैया म्हणजेच प्रदीपचा अवलीपणा.. त्याचा अतरंगीपणा ही प्रेक्षकांसाठी मेजवानी होती. प्रदीपच्या काळात नाटक आणि चित्रपट ही दोनच माध्यमे होती. चित्रपटात वावरूनही त्याने चोखंदळपणे नाटकाचीच निवड केली. कारण नाटकाची प्रेक्षकांशी एक बांधिलकी असते. या तिघांच्याही आठवणी एकमेकांत इतक्या गुंफल्या गेल्या आहेत की मावशीच्या प्रत्येक प्रयोगाला एक कोळीण विजयसाठी गजरा घेऊन यायची. आणि विजय नेहमी तोच गजरा घालायचा. कधीही त्या मावशीचा नेम चुकला नाही. आम्हीही तिच्यासाठी आणि टी गेल्यानंतरही तिच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवायचो. याच बांधिलकीने प्रदीप शेवटपर्यंत नाटकाशी बांधील राहिला.. आणि बांधील राहील.!