अक्कलकोटमध्ये पुरातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असला, तरी सर्वसामान्यांच्या जीवनात मात्र जिवंतपणी व मरणानंतरही यातना सुटलेल्या नाहीत. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर या गावात नदीवर पूल नसल्याने चक्क पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाजवळ हरणा नदी वाहते. गावकऱयांनी वेळोवेळी राज्यकर्ते व प्रशासनाला निवेदन देऊन पुलाची मागणी केली. मात्र, या नदीवर अद्यापि पूल बांधण्यात आलेला नाही. पितापूर गावातील नूर भंडारी या मुस्लिम ग्रामस्थाचे काल रात्री निधन झाले होते. नदीच्या पलीकडे मुस्लिम कब्रस्तान आहे. हरणा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. पूल नसल्याने ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी जीव धोक्यात घालून नदीच्या पुरातूनच अंत्ययात्रा काढत नदीच्या पलीकडे मृतदेह नेऊन अंत्यविधी उरकला.