
चांदोली धरण पाणलोटात अतिवृष्टी सुरूच आहे. सध्या धरणातून विसर्ग सुरू असला, तरी शनिवारी कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणीपातळी स्थिर राहिली. सांगलीच्या आयर्विन पुलाची पातळी संध्याकाळी 29 फुटांवर होती. दरम्यान, जिह्यात पावसाने उसंत घेतली. सलग दुसऱया दिवशी पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांना जोर आला आहे.
चांदोली धरणक्षेत्रात 24 तासांत 90 मिलिमीटर पाऊस झाला. धरणात 21.38 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून नऊ हजार 365 क्युसेकने विसर्ग सुरूच आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ झाल्याने पाणी पात्राबाहेर पडल्याने पुराचा धोका कायम आहे. पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणाऱया पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणीपातळी पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कृष्णा आणि वारणा नद्यांवरील आरळा-शित्तूर, काखे-मांगले पूल पाण्याखाली गेले. याशिवाय दोन्ही नद्यांवरील 13 बंधारे पाण्याखाली कायम आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिह्याच्या बहुतांशी भागांत उघडीप दिली. शिराळा, वाळवा तालुक्यांतील काही भागांत रिमझिम पाऊस झाला. पाऊस थांबला तरी ओढे-नाले ओसंडून वाहत आहेत.






























































