
पाटोदा शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या पाटोदा-मांजरसुंबा या महामार्गावर सकाळी स्विफ्ट आणि आयशर ट्रक या दोन वाहनांचा भरधाव वेगात समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. भीषण अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. स्विफ्टमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला.
रविवारची सकाळ बीड जिल्ह्यासाठी अत्यंत दु:खाची आणि वेदनादायी ठरली. शिवसंग्रामचे नेते तथा जिल्ह्याचे भुमिपुत्र विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी धडकत नाही तोच मांजरसुंबा-पाटोदा या महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला. केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील रहिवाशी असलेले रामराव कुटे हे सलग सुट्टी असल्याने पुणे येथे आपल्या मुलीला घेवून आणण्यासाठी गेले होते. मुलीला घेऊन परतत असताना पाटोदा शहराजवळील पाटोदा-मांजरसुंबा या मार्गावर बामदळे वस्तीजवळ कुटे यांच्या स्विफ्ट गाडीला आयशर टेम्पोचा समोरासमोर अपघात झाला. वेगाने असलेली दोन वाहने समोरासमोर धडकल्याने दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. स्विफ्ट गाडी ही आयशर ट्रकमध्ये घुसली. या भीषण अपघातमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. यात रामहरी चिंतामण कुटे (40), सुनिता रामहरी कुटे (35), ऋषिकेश रामहरी कुटे (19), आकाश रामहरी कुटे (15), प्रियंका रामहरी कुटे (17), राधिका सुग्रिव केदार (11) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलिसांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचे दृष्य पाहून पोलिसही हादरले. अत्यंत भीषण अपघातामध्ये मृतदेह छिन्न-विछिन्न झाले होते. क्रेनच्या साहाय्याने स्विफ्ट आणि आयशर वेगळ्या करण्यात आल्या स्विफ्टमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.


































































