आता खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांनाच समजलं, आदित्य ठाकरे यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली. या अधिवेशनानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत बंडखोर आमदार व भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांचा गेम झालाय आणि आता राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण आहेत ते सर्वांनाच समजलंय, असे सांगत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

”गद्दार जे त्यांच्यासोबत गेले आहेत त्यांचा गेम झालाय. मंत्रीमंडळ स्थापन झाल्यानंतर आता खरा मुख्यमंत्री कोण हे सगळ्यांना कळलेलं आहे. अपक्ष जे त्यांच्याबरोबर गेले त्यांना कुठेही स्थान मिळालेलं नाहीए. चांगले काम करणाऱ्या महिला आहेत, त्यांना स्थान मिळालेलं नाही. मुंबईतील कुणालाही स्थान मिळालेलं नाही. यावरून त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की निष्ठेला कुठेही स्थान नाही. ज्यांना स्थान दिलं त्यांनाही फारशी किंमत देखील दिली गेलेली नाही”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

सणांमध्ये राजकारण आणू नये

भाजपकडून वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी साजरी केली जात आहे. त्याबाबत पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारले त्यावर ते म्हणाले, ”वरळी आता सगळ्यांना आवडू लागली आहे. हे चांगलं आहे. पण हा आपला सण आहे. कोविडमुळे तब्बल दोन वर्षानंतर आपण सणवार साजरे करतोय. त्यात उगाच कार्यकर्त्यांची लढाई लावणं, ताणतणाव निर्माण करणं, पोलिसांवर दबाव टाकणं हे होऊ द्यायचं नाही. असा पोरकटपणा, बालिशपणा आम्ही करणार नाही. सगळ्यांनी सण साजरा करावा व कुठेही त्यात राजकारण आणू नये अशा मताचे आम्ही आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेनेने 2019 मध्ये देशाला सत्तांतराचा पर्याय दाखवला

आम्ही 2019 मध्ये देशाला सत्तांतराचा पर्याय दाखवला. पण दुर्दैवाने आमच्यातीलच काही गद्दार निघाले ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीत खंजीर खुपसला. ही कधीही आपल्या देशाची राज्याची संस्कृती नाही. हे घाणेरडे राजकारण आहे. हे राजकारण दूर करण्याचं काम आम्ही करत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत

जे गेलेयत त्यांच्याशी संपर्क नेहमीच असतो. जे गेलेयत ते आता तिथे नजरकैदेत आहेत. त्यातील काहींना असंही वाटतंय की आता आपल्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत की नाही? मला त्यांना एकच सांगायचंय की मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी कायम खुले आहेत. पण ज्यांना तिथे राहायचंय त्यांनी आमदाराकीचा राजीनामा द्यावा व निवडणुकीला सामोरे जावं, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना केलं आहे.

चाळीस गद्दारांना तिथे बसण्याचा नैतिक अधिकार नाही

आज आम्ही अधिवेशनात स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला मात्र तो मंजूर झाला नाही. पायऱ्यांवर बसून आम्ही या गद्दार सरकारविरोधात आंदोलन केलं. हे सरकार लोकशाहीविरोधी आहे. बेईमानांचं सरकार आहे. सध्या राज्यात फक्त राजकारण चाललं आहे. त्यांना जनतेचा आवाज ऐकू येत नाही. घटनेच्या विरोधात ते काम करत आहेत असे आदित्य यांनी म्हटले. न्यायदेवतेकडे आम्ही न्याय मागितला आहे, आम्ही घटनेचे सेवक आहोत; घटनेचे पुजारी आहोत. घटना मानूनच चालू असे ते पुढे म्हणाले. कायद्यात बघितलं तर व्हीप हा शिवसेनेचा म्हणजे आमचाच आहे. हे जे चाळीस गद्दार आहे. यांचा ना व्हीप आहे ना यांना नैतिक अधिकार आहे तिथे बसण्याचा, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना फटकारले