
महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी शिवसेना ही ‘संस्कृती’ आहे आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दैवत. कोणताही दबाव, आमिषे यांना भीक न घालता आपली संस्कृती जपणे, तिचा अपमान होणार नाही असे वागणे म्हणजेच निष्ठा. हीच शिकवण देणारी निष्ठेची दहीहंडी 19 ऑगस्टला युवासेनेच्या वतीने शिवसेना भवनासमोरील जिप्सी कॉर्नर येथे उभारली जाणार आहे. ही हंडी फोडणाऱया गोविंदांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
छत्रपती शिवाजी पार्क मैदानालगत हे जिप्सी कॉर्नर आहे. तिथे शुक्रवारी दुपारी 1 ते 8 या वेळेत ही निष्ठा दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दहीहंडी सोहळा साजरा होणार आहे. मान्यवरांची उपस्थिती, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यानिमित्ताने दोन वर्षांनंतर पुन्हा पाहायला मिळणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकांनी या ‘निष्ठा दहीहंडी’ला उपस्थित राहून सोहळय़ाचा आनंद व उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन युवासेनेच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.































































