
राज्यात ऑगस्टच्या पंधरवडय़ापर्यंत सरासरीच्या तुलनेत 31 टक्के अधिक पाऊस झाला असला, तरी सांगली जिह्यात सरासरीनुसार पाऊस 13 टक्क्यांनी कमी आहे. यंदा चांदोली धरण पाणलोटक्षेत्र वगळता, जिह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याचे स्पष्ट झाले. वारणा धरण 90 टक्के भरले असून, ते पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बुधवारीही पावसाने जिह्यात उघडीप दिली.
जिह्यात यंदाच्या हंगामात जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र, जुलैमध्ये तिसऱ्या आठवडय़ापर्यंत झालेल्या जोरदार पावसाने जूनमधील पावसाची सरासरी भरून काढली. त्यामुळे राज्यातील एकूण पाऊस सरासरीच्या पुढे जाऊ शकला. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात आणि ऑगस्टच्या सुरुवातीच्या टप्प्यातही बहुतांशी भागांत पावसाची उघडीप होती. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कमी दाबाचे पट्टे आणि समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने राज्याच्या अनेक भागांत पाऊस होतो आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला, तरी आठवडय़ात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काही भागांत मोठा पाऊस झाला.
मुंबई शहरात तर सरासरीच्या तुलनेत पाऊस नऊ टक्क्यांनी मागे पडला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिह्यांतही पाऊस सरासरी ओलांडून फार पुढे जाऊ शकलेला नाही. मध्य महाराष्ट्रातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा 32 टक्क्यांनी अधिक असून, केवळ सांगली या एकाच जिह्यात पाऊस 13 टक्क्यांनी उणा आहे. सांगलीतील सरासरी प्रमाण 309 मिलिमीटर असून, तेथे 269 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस नांदेड (84 टक्के अधिक), नागपूर (73 टक्के अधिक) या जिह्यांमध्ये झाला आहे.
दरम्यान, बुधवारी जिह्यात पावसाने उघडीप दिली. सांगलीत आयर्विन पुलानजीक पाणीपातळी 24 फूट होती. अलमट्टी धरणात सध्या दोन लाख तीन हजार 934 क्युसेक पाण्याची आवक होत असून, धरणात 112.45 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण 92 टक्के भरले आहे. धरणातून दोन लाख 25 हजार क्युसेकने सुरू असलेला विसर्ग बुधवारी लाखाने कमी करून एक लाख 25 हजार क्युसेक केला आहे. कोयना 92 टक्के, तर वारणा धरण 90 टक्के भरले आहे.




























































