
नवी दिल्ली ते मुंबई ग्रीन कॉरिडॉरचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून नवी दिल्ली ते नरीमन पॉईंट 12 तासांत इलेक्ट्रिक लक्झरी बस चालवण्याचे आपले स्वप्न असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. देशातील पहिल्या एसी इलेक्ट्रिक डबलडेकरचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते यशवंत चव्हाण सेंटर येथे गुरुवारी दुपारी संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ‘या देशातील डिझेल आणि पेट्रोल हटवा असे मी म्हणायचो तर लोक मला हसायचे. आता इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. मी तर म्हणेन अशा लक्झरी बस इलेक्ट्रिक एसी बस दिल्ली ते चंदीगड, दिल्ली ते सिमला चालवा. आता दिल्ली ते डेहराडून, हरीद्वार, जयपूर प्रत्येकी दोन तास, चंदीगड अडीच तास अमृतसर चार तास, कटरा सहा तास श्रीनगर आठ तास अंतर ग्रीन कॉरीडॉरमुळे कापले जाऊ शकते असेही त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये हब!
येत्या पाच वर्षांत आपला देश पर्यायी इंधन बस निर्मितीमध्ये जागतिक हब बनेल, आमच्या ऊर्जा मंत्रालयाने अशा पाच हजार बसेसची नोंदणी केली आहे. इलेक्ट्रिक नॉन एसी बस चालविण्याचा खर्च दर कि.मी. मागे 39 रुपये हा डिझेलच्या दरांपेक्षा फारच कमी असून प्रदूषण नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, ग्रीन हायड्रोजन हेच भविष्य असून हायड्रोजनवरची कार नुकतीच आपण चालविण्याचेही त्यांनी सांगितले.
View this post on Instagram
महिला वर्गाला डबल डेकर पसंत…
ही इलेक्ट्रिक डबल डेकर आत उंचीला थोडीशी आखुड असून प्रवाशांना आसनावरून उठताना आपले डोके सांभाळून उठावे लागणार आहे. या बसमध्ये दोन दरवाजे आहेत. हिरव्या रंगसंगतीचा वापर केला आहे. तळमजल्यावर आत वर जाण्यासाठी वेगळा जिना ड्रायव्हर सिटीच्या मागच्या बाजूला आहे. तळ मजल्यावर 33 आसने आहेत. तर एकूण 66 आसने असून एकूण 88 प्रवासी सामावू शकतात. असे स्विच मोबिलिटीचे सीईओ महेश बाबू यांनी सांगितले. ही बस वजनाने हलकी असली जास्त प्रवाशांचे वजन पेलण्याची तिची ताकद असून तिची किंमत 1.8 ते 2.3 कोटींच्या घरात आहे. ड्रायव्हर सिटीच्या आणि प्रवाशांच्या मध्ये कोणताही आडपडदा ठेवलेला नाही. अगदी परदेशी डिझाईन असून स्विच मोबिलिटी ही मुळ लंडनची कंपनी असून चेन्नई तिचे देशातील कार्यालय आहे. परंतु लंडन येथे धावणाऱ्या अशा डबलडेकरना ‘मेट्रो डेकर’ म्हणतात. तिची सर हिला नाही! आतील उंची कमी असलेली ही डबलडेकर महिला वर्गाला मात्र आवडली असून हीचे हँडल सहज हातात येतात अशी प्रतिक्रिया प्रथम संस्थेच्या महिला कर्मचाऱ्यांनी दै. सामनाशी बोलताना दिली.
आधीविरोध आता श्रेय!
स्विच मोबिलिटी आणि अशोक लेलॅण्ड यांच्या या बेस्टने काढलेल्या टेंडर विरूद्ध भाजपाने रान पेटविले होते. परंतु आता मात्र श्रेय घेण्यासाठी बेस्टचे माजी सदस्य आणि भाजपचे आमदार अतुल शहा पुढे सरसावले होते.
कुलाबा आणि बीकेसीत धावणार…
देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस सप्टेंबरपासून कुलाबा आणि कुर्ला ते बीकेसी परिसरात धावणार आहे. अशा 200 बस सप्टेंबर 2023 बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.



























































