नगर मनपाची जुनी इमारत मोजतेय अखेरच्या घटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मिलिंद देखणे 

महापालिकेचे कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर जुन्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या जुन्या इमारतीची सध्या अतिशय दयनीय अवस्था झाली असून, ठिकठिकाणी बांधकामाची पडझड झाली आहे. या इमारतीत अनेक विभाग सध्या कर्यरत असून, अशा मोडकळीस आलेल्या कार्यालयांमध्येच अधिकारी-कर्मचाऱयांना जीव मुठीत धरून काम करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आतातरी जाग येऊन या इमारतीची दुरुस्ती होणार का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

नगर शहरामध्ये पूर्वी महापालिकेची जुनी इमारत शहरामध्ये होती. त्यानंतर ती नगर-संभाजीनगर महामार्गावर हलविण्यात आली. त्यामुळे जुन्या महापालिकेत प्रभाग कार्यालय, आरोग्य विभाग, जन्म-मृत्यू विभाग, मालमत्ता नोंदणी, कर कार्यालय, विवाह नोंदणी कार्यालय, तर माहिती सुविधा अशी कार्यालये सध्या कार्यान्वित आहेत. जुन्या महापालिकेमध्ये 10 वर्षांपूर्वी महत्त्वाचा असलेला मनपा सभागृह हॉल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. मात्र, त्याची आजवर दुरुस्ती झालेली नाही. या ठिकाणी असलेल्या कार्यालयांमध्ये बसण्यासाठी व्यवस्था नाही, फर्निचरचाही अभाव आहे, विद्युतजोडणी नाही, ठिकठिकाणी गवत उगवल्यामुळे इमारतीत पावसाचे पाणी गळत आहे. दुसरीकडे, याच कार्यालयाची संरक्षक भिंतही ठिकठिकाणी पडल्यामुळे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था सध्या पाहायला मिळत आहे.

नगर शहरामध्ये असलेली महापालिकेची जुनी इमारत गेल्या 10 वर्षांपासून अशाच अवस्थेत पडून आहे. अनेक वेळा अधिकारी या ठिकाणी येतात-जातात, पदाधिकारी येतात-जातात. या ठिकाणी असलेले सभागृह 10 वर्षे आगीच्या भक्ष्यस्थानी जाऊनही अद्यापि बांधू शकले नाहीत. आज महापालिकेची मुख्य नवीन इमारत झाली असून, तेथेही अनेक कामे अर्धवट आहेत. मात्र, जुन्या इमारतीकडे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाने यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

पुरातन वास्तूमुळे बांधकामात अडचणी

जुन्या महापालिकेच्याच कार्यालयापाशी पुरातत्व खात्याची वास्तू आहे. त्यामुळे बांधकाम करण्यात अडचणी येत आहेत. आसपासच्या नागरिकांचीसुद्धा अशीच समस्या आहे. या सर्व बाबींचा विचार करता, आगामी काळात नागरिकांच्या प्रश्नांसाठी व महापालिकेच्या कर्मचाऱयांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण आहे.

अग्निशमनच्या ‘त्रिदल’ वसाहतीचीही दुरवस्था

महापालिकेच्या या जुन्या इमारतीशेजारी अग्निशमन दल आहे. तेथील कर्मचाऱयांना सोयी-सुविधा नाहीत. विशेष म्हणजे, या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱयांची ‘त्रिदल’ नावाची जुनी वसाहत आहे. त्याचीसुद्धा दयनीय अवस्था झाली आहे.

अनेक सरकारी कार्यालयांचे नूतनीकरण

शहरातील अनेक सरकारी-निमसरकारी कार्यालयांची अवस्था सुधारण्यास सुरुवात झाली आहे. नव्याने बांधकामे होत आहेत. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांसह अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे काही कार्यालये पूर्णत्वाला गेली, तर काही कार्यालयांची अवस्था आजही दयनीयच आहे.