
देशात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा सर्रासपणे गैरवापर होत असून आता तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातही सीबीआयचा वापर होऊ शकतो, अशी भीती मला वाटत असल्याचे मत काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी व्यक्त केले आहे.
माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम पार पडत आहेत. नागपुरातही टेन्को रॅलीचे आयोजन केले होते. त्याला कन्हैया कुमार यांनी हजेरी लावली होती. केंद्रीय तपास यंत्रणा देशाच्या सुरक्षेसाठी आहेत, पण आताचे सरकार आपल्या खुर्चीच्या सुरक्षेसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करतेय. विरोधी पक्षांना दाबण्यासाठी त्यांचा वापर केला जातोय. मात्र आपल्या दोस्तांना सूट देत असल्याची टीका कन्हैया कुमार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर केली आहे. आज जे देशाला विकत आहेत त्यांना शुद्धीवर आणण्याची गरज आहे. ज्या लोकांना या देशाला वाचवायचे आहे ते लोकच देश विकणाऱयांना शुद्धीवर आणतील, असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला.



























































