
मुंबईत सलग दोन वर्षे कोरोनाच्या बंधनात अडकलेल्या गोविंदांनी या वर्षी मात्र ‘बोल बजरंग बली की जय’चा जयघोष करीत ‘ढाक्कुमाकुम… ढाक्कुमाकुम’च्या तालावर ठेका धरीत दहीहंडी उत्सवात अक्षरशः ‘काला’ केला. हजारो गोविंदांचे तांडेच्या तांडे मिळेल त्या वाहनाने मुंबईपासून ठाण्यापर्यंत मानाच्या दहीहंडीला सलामी देत होते. गोविंदांमध्ये तरुणांसह बाल गोविंदा आणि काही ज्येष्ठांचा उत्साहदेखील ओसंडून वाहत होता. यामध्ये महिला गोविंदा पथकेही थरावर थर रचून सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. अनेक ठिकाणी सकाळी सुरू झालेला उत्सव रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
लोअर परळ सनमिल रोड येथील हनुमान सेवा मंडळाच्या दहीहंडी उत्सवात 83 वर्षांचे तरुण मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे यांनी तिसऱया थरावरून दहीहंडी फोडली.
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ आयोजित ‘दहीहंडी निष्ठावंतांची’चे मानकरी ठरलेल्या ओमकार मित्र मंडळ, कुंभारवाडा यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेत्या मीना कांबळी, माऊली प्रतिष्ठान उपाध्यक्षा पल्लवी सकपाळ, विभाग संघटक जयश्री बाळ्ळीकर उपस्थित होते.























































