भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यानं शिंदे गटात धूसफूस, खासदारांमध्ये नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती लक्षात घेत प्रत्येक पक्षानं निवडणुकांची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचं कळतं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाण्यातील एका कार्यक्रमात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठं भाष्य केलं आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत बुलढाण्याचा खासदार हा कमळाचा असला पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत या जागेवर शिवसेनेन प्रतापराव जाधव यांना तिकीट दिलं होतं आणि ते विजयी झाले होते. मात्र हेच प्रतापराव जाधव सध्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या विधानानंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या प्रतापराव जाधव यांची चांगलीच गोची झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनीच असं विधान केल्यानंतर प्रतापराव जाधव आता कोणती भूमिका घेणार असा प्रश्न विचारला जात आहे.

‘मोदींचे हात बळकट करण्यासाठी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाण्याचा खासदार कमळाचा द्यावा लागेल’, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिंदे गटात धूसफूस वाढली आहे.

बुलढाण्यात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव लोकसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून बावनकुळे हे जिह्यात आले होते. जिह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बावनकुळे यांनी 2024 ला बुलढाणा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच झाला पाहिजे. त्यासाठी भूपेंद्र यादव यांचा प्रवास होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने प्रतापराव जाधवांना धक्का बसला आहे.

भाजपचे मिशन 45 मुळे शिंदे गटात घबराट

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 45 जागांवर आपले उमेदवार लढवण्याची तयारी सुरू केल्याचं वृत्त आहे. यामुळे शिंदे गटासोबत गेलेल्या खासदारांची गोची झाली आहे.