
हे तात्पुरते सरकार हे हिंदुत्वाचे सरकार असल्याचे सांगण्यात येत होते. अशा सरकारमध्ये अशा घटना होत आहेत. मुंबईत गणेश मंडळाच्या आगमन मिरवणुकीत काहीतरी वाद उफाळल्याची माहिती आहे. अशा घटना चिंतादायक आहेत, असे शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. अजूनपर्यंत आपल्याकडे दंडीहंडीबाबतचा कोणताही जीआर आलेला नाही. अनेक मंडळे आपल्याला पत्र पाठवत आहेत. भेटत आहेत. नोकऱ्यांसाठी 5 टक्के आरक्षण सरकारकडून सांगण्यात आले आहे, ते नेमके कसे मिळणार असा प्रश्न ते विचारत आहेत. हा त्या मंडळाचा विश्वासघात होता की ही धूळफेक होती, असे अनेक विषय आहेत.
सध्या हे जे काही सुरू आहे, ते आपल्या राज्यासाठी, लोकशाहीसाठी चांगले नाही. हे सरकार राज्याच्या आणि लोकशाहीच्या विरोधात आहे, हे आता जनतेलाही समजले आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला वॉर्डरचनेला स्थगितीचा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये दिलेल्या निकालानुसार मार्चपूर्वी जी वार्डरचना होईल, ती अंतिम असेल, असा निकाल दिला होता. सरकार बदलल्यावर आलेल्या तात्पुरत्या सरकारने वॉर्डरचना बदलून घेतली आणि त्यांच्या सोयीची वॉर्डरचना केली होती. वॉर्ड रचना, आरेबाबतचा निर्णय, मुंबई किंवा राज्याबाबतचा घेतलेला कोणताही निर्णय त्यांनी स्वार्थापोटीच घेतला आहे. मुंबई आणि राज्याचे हित न बघता हे तात्परुते सरकार असे निर्णय घेत आहेत.
गद्दारांसोबत तिकडेही गद्दारीच झाली!
गद्दारांच्या स्थितीवर हसायचं नाही तर काय करायचं, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. ‘मी आधीही बोललो आहे की जी गद्दारी झाली त्यातून मिळालं काय? आणि पहिली बॅच जी गद्दारांची तिथं गेली त्यापैकी किती लोकांचा विश्वास राखला गेला की त्यांचा विश्वासघात झाला? त्यांच्यासोबतही गद्दारीच झाली आहे.
शिवसेनेत पुढे जाण्याची संधी होती त्यांचं देखील करिअर गद्दारीमुळे संपलं!
मला वाईट यासाठीच वाटतं आहे की ज्यांना शिवसेनेत पुढे जाण्याची संधी होती त्यांचं देखील करिअर या राजकीय गद्दारीतून संपलं आहे, असं म्हणत त्यांनी शिंदे गटासोबत गेलेल्यांबद्दल खंत व्यक्त केली. ‘त्यासोबत जे 50 थर म्हणा की खोके म्हणा जे काही असेल त्या खालच्या थरांना लाथ मारून वरच्या लोकांनी मलई खाल्ली’, असंही ते म्हणाले.
तात्पुरते सरकार शेतकरी ,महिला अत्याचार सारख्या महत्त्वाच्या घटनांकडे लक्ष नाही. फक्त ठाकरे कुटुंबिय आणि शिवसेनेवर बोलत राहा, यावरच त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. असे असतानाही जनतेचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे. जनता आमच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे. जनतेचे प्रेम आम्हाला मिळथ असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






























































