बालकांचा सोनपाखरू हरविला कुठं, सोनपाखरू दुर्मिळ होण्याची काय आहेत कारणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिषेक भटपल्लीवार

बालकांमध्ये विशेष आकर्षक असलेलं सोनपाखरू आता दिसेनासे झाले आहे. साधारणत: पंधरा-वीस वर्षापूर्वी सोनपाखरू हा बालकांचा सर्वाधिक आवडता मित्र. अगदी अंगाखांद्यावर बालके सोनपाखराला खेळवायाची. सोनपाखरांची रंगीबेरंगी अंडी कुणाकडे अधिक आहेत याची जणू होळ लागायची. कधी काळी बालकांचे विश्व व्यापून बसलेले हे सोनपाखरू आता दुर्मिळ झाले आहे. ही प्रजाती संकटात आहे. मोबाईल हाताळणाऱ्या चिमुकल्या हातांना सोनपाखराचा स्पर्श अनोळखी आहे. मात्र आज म्हातारपणाचा उंबरठ्यावर असलेल्यांनी या किटकाला सर्वाधिक प्रेम दिलं होतं,हे विसरणे अशक्य.

हिंदुस्थानातील अत्यंत सुंदर, आकर्षक किटकांपैकी एक किटक म्हणजे सोनपाखरू. ग्रामीण भागात सोनपाखरू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या किटकाचे शास्त्रीय नाव ” इंडीयनज्वेल बिटल ( indian jewel beetle )” असे आहे. ही एक किटक प्रजाती आहे. साधारणत: पंधरा-वीस वर्षापुर्वी हा सोनपाखरू हमखास काटेरी झुडुपावर सापडायचा. बालकांचा हा आवडता सोनपाखरू आता हरवत चालला आहे. दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे. मोबाईल हातळणाऱ्या बालकांना सोनपाखरू कसा दिसायचा हे ही सांगणे कठीण होऊन बसले आहे. गावाजवळ असलेल्या झाडझुडपावर दिसणारा सोनपाखरू आता केवळ फोटोत दिसत आहे.