Ganpati Bappa Morya मराठी तरुणांची भन्नाट आयडिया, असाही करा ‘या इको फ्रेंडली मखरांचा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्वेता पवार – सोनावणे 

गणेशोत्सवाला अवघा एक आठवडा उरला आहे. सर्वत्र गणपतीच्या स्वागताची लगबग सुरू आहे. गणपतीसाठी बाजारात एकापेक्षा एक सरस डेकोरेशन आले आहेत. गणपतीसाठी आपण मोठ्या उत्साहात डेकोरेशन घेतो. गणपती बाप्पा आल्यावर त्या डेकोरेशनचं करायचं काय असा प्रश्न पडतो. बाप्पाला प्रेमाने ज्या मखरात बसवलं तो मखर देखील आपल्याला तितकाच प्रिय असतो. भाविकांची हिच ओढ लक्षात घेऊन दोन मराठी तरुणांनी भन्नाट असे इको फ्रेंडली मखर तयार केले आहेत जे तुम्ही बाप्पाच्या विसर्जनानंतरही घरात बाप्पाची आठवण म्हणून ठेवू शकता. अभिजीत मुरुडकर व आतिष मुरुडकर या कल्पक भावंडांच्या डोक्यात एक सुपिक कल्पना सुचली व त्यातूनच घडले फोल्डेबल आणि रियुझेबल मखर.

अभिजीत व आतिष यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या आईच्या नावावर ‘सरस्वती आर्ट्स’ सुरू केले. या बॅनर अंतर्गत हे दोन भाऊ गेल्या पंधरा वर्षांपासून मखर बनवत आहेत. गेल्या काही वर्षात थर्माकॉलचे मखर जाऊन इको फ्रेंडली मखर आले. मात्र त्यांनी त्यातही आपला हातखंडा असल्याचे दाखवून दिले. लाकूड व कागदाचा लगदा वापरून ते मखर बनवत होते. गेल्या वर्षी त्यांनी काही हटके द्यायचे म्हणून थ्रीडी मखर तयार केले. या वर्षी अभिजीतच्या चित्रांचे लखोटे.

त्यांचा थ्रीडी मखर हा प्लायवूड व कागदाच्या लगद्यापासून तयार केलेला आहे. एखाद्या शिल्पासारख्या दिसणाऱ्या या मखराला कागदाचा लगदा वापरून थ्रीडी इफेक्ट दिला आहे. त्यावर महादेव, महालक्ष्मी व तिरुपती बालाजी, हनुमान यांचे मुखवटे आहेत. याचं वैशिष्ट म्हणजे हे मखर तुम्ही फोल्ड देखील करू शकता त्यामुळे गावी देखील तुम्ही ते सहज नेऊ शकता.

चित्रकार असलेल्या अभिजीतच्या चित्रांचे लखोटे यावर्षी अभिजीतने बाजारात आणले आहेत. त्याच्या चित्रांचे स्टँडी तयार करण्यात आले असून त्यासाठी उच्च प्रतिचे न चुरगळणारे कापड वापरण्यात आले आहेत. अभिजीतने मखरांसाठी अत्यंत सुंदर अशी चित्रं काढली आहेत. त्या चित्रांच्या स्टँडसोबत गणपती बाप्पासाठी आसन व लोडही दिलेले आहेत.

पुन्हा वापरू शकता हे मखर

मुळातच सुंदर असलेले हे मखर तुमच्या गणेशोत्सवाची शोभा वाढवतीलच पण गणेशोत्सवानंतर देखील त्याचा तुम्ही वापर करू शकणार आहात. थ्रीडी मखऱांचा खालचा भाग वेगळा केला तर तुम्ही ते हँगिंग शिल्प म्हणून देखी घरात लावू शकता. तर चित्रांच्या खालची बाप्पाची आसन व्यवस्था व स्टँड वेगळा केला तर ते तुमच्या घरात फ्रेम करूनही लावू शकता. या दोन्हींमुळे तुमच्या घराची शोभा वाढणार हे नक्की

रात्र रात्र जागून बनवले मखर

अभिजीत व आतिष हे दोघे भाऊ एलफिनस्टन येथील चाळीत राहतात. चाळीत राहत असल्याने घर लहान, बाहेर कायम रहदारी. अशात हे दोन भाऊ गेली पंधरा वर्ष रात्री जागून मखर तयार करतात. रात्री अकराच्या सुमार चाळकरी झोपले की या दोन भावांची कामं सुरू होतात व पहाटे ते उठायच्या आत म्हणजे पाचच्या सुमारास ते आपलं काम आटोपतं घेतात.

हे मखर हवे असल्यास खालील नंबर वर संपर्क करा..

अभिजित मुरूडकर – 9773590121

अतिश मुरुडकर – 9833085173

पत्ता: 14/26 फितवाला बिल्डिंग, फितवाला रोड, एल्फिन्स्टन, मुंबई 400013.