
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सध्या तपासणी मोहिम सुरु आहे. मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे एका संशयीत वाहनाची तपासणी करत असताना त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी दारुचे 110 बॉक्स अवैधरित्या वाहतूक करत असताना सापडले. हे सर्व बॉक्स जप्त करण्यात आले असून वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क विभागाने पकडलेल्या दारुमध्ये मॅकडवेल नं. 1 गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या 180 मिलीच्या बाटल्या असलेले 75 बॉक्स, इंपेरिअल ब्ल्यू गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या 180 मिलीच्या बाटल्या असलेले 25 बॉक्स, रॉयल स्टॅग गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या 180 मिलीच्या बाटल्या असलेले 10 बॉक्स, अशोक लेलॅण्ड कंपनीचे पांढऱ्या रंगाची गाडी, दोन मोबाईल सापडले. एकूण 13 लाख 44 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. हा मद्यसाठा गोवा राज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात होता. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरीचे अधीक्षक सागर धोमकर, उपअधीक्षक वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बापूसाहेब डोणे, दुय्यम निरिक्षक सत्यवान भगत, जवान अर्शद शेख, दत्तप्रसाद कालेलकर यांनी केली.




























































