पैठणच्या कार्यक्रमात गद्दार भुमरेंसमोर रिकाम्या खुर्च्या, ‘बघ्यां’नीसुध्दा फिरवली पाठ !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केवळ सत्तेसाठी ईमान बदलणाऱ्या गद्दाराचा चेहराही पैठणकरांनी पाहिला नाही. गद्दारी केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी मतदारसंघात आलेल्या संदिपान भुमरे यांच्या कार्यक्रमाकडे पैठणकर फिरकलेही नाहीत. रिकाम्या खुर्च्या पाहून आग आग झालेल्या भुमरेंची गाडी निष्कारणच वारकऱ्यांवर घसरली. ‘नाथमंदिरात वारकऱ्यांना मी फुकट जेवण देतो तरीही मला गद्दार म्हणता’, असे म्हणत भुमरेंनी वड्याचे तेल वांग्यावर काढले.

साखर कारखान्यात कारकुनी करणाऱ्या संदिपान भुमरे यांना शिवसेनेने तब्बल पाच वेळा
आमदार केले. रोहयोसारखे ग्रामीण विकासाशी नाळ जोडणारे खाते दिले, पण ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात छेद करून संदिपान भुमरे यांनी मतलबासाठी शिंदे गटात उडी घेतली. गद्दारी केल्यानंतर पैठणला तोंड दाखविण्याची त्यांची हिंमतच झाली नाही. अगदी नाथषष्ठीलाही भुमरे लपून-छपून आले आणि दर्शन घेऊन लगेच संभाजीनगरकडे पसार झाले.

बघ्यांनीही पाठ फिरवली

कै. आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ ठाणे येथील एका संस्थेच्या वतीने शनिवारी पैठण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10ची वेळ असतानाही भुमरे हे तब्बल 4 तास उशिराने कार्यक्रमस्थळी आले. आपण पैठणमध्ये येणार आहोत, हे भुमरे यांनी फोनाफोनी करून कळवले होते. परंतु, तरीही या कार्यक्रमाकडे पैठणकरांनी पाठ फिरवली. पैठणचा छत्रपती शिवाजी महाराज चौक हा अर्ध्या रात्रीही माणसांनी गजबजलेला असतो. परंतु, बघेही या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. भुमरेंच्या भोवती पिंगा घालणारे गुत्तेदार वगळता आयोजक कार्यकर्त्यांशिवाय एकही पैठणकर कार्यक्रमस्थळी नव्हता.

जुन्या बाटलीत नवी दारू….

नाथमंदिरात मी वारकऱ्यांना फुकट जेवण देतो, असे भंपक विधान करून संदिपान भुमरे यांनी वारकऱ्यांचाही अपमान केला. विशेष म्हणजे नाथमंदिरातील अन्नछत्र हे दानशूरांच्या सहभागातून आणि नाममात्र दरात चालविले जाते. त्यानंतर भुमरेंची गाडी ‘ईकासा’वर आली. पैठण एमआयडीही, संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट करतो. पैठणी साडीसाठी संस्थेच्या वतीने आज शनिवारी योजना तयार आहे. शहराला मिनरल वॉटरचा पुरवठा करतो, अशा जुन्याच घोषणा त्यांनी पुन्हा नव्याने केल्या.

नुसता थयथयाट

संदिपान भुमरे हे आज पैठणमध्येच होते. आता गर्दी होईल मग कार्यकर्ते येतील, या आशेवर त्यांनी चार तास काढले. कार्यक्रम दिघेंच्या नावावर असल्याने त्याकडे पाठ फिरवून गेल्यास आणखी नसते झेंगट नको म्हणून जड पावलांनी भुमरे कार्यक्रमस्थळी आले. समोरच्या रिकाम्या खुर्च्या पाहून त्यांचा तीळपापड झाला. आपण गद्दारी का केली, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही.

माझ्यामुळे तुमचे पेपर चालले!

समोरच्या रिकाम्या खुर्च्या पाहून संदिपान भुमरे यांचा जळफळाट झाला. भाषण करता करता त्यांची गाडी थेट पत्रकारांवर घसरली. ‘माझ्यामुळे तुमचे पेपर चालले, नाही तर बंद पडले असते. पत्रकारांसाठी कालपर्यंत मी चांगला होतो, आता माझा ‘गद्दार’ असा उल्लेख करता. तुमच्या पेपरचा खप फक्त सोशल मीडियावरच आहे. तुमच्या बातम्यांना कोणी कुत्रंही विचारत नाही’, असे गरळ भ्रमरे यांनी ओकले.

‘नाथमंदिरात वारकऱ्यांना फुकट जेवण देतो अजून काय पाहिजे… कालपर्यंत मी चांगला होतो. आता मला गद्दार म्हणता. साखर कारखान्यात कारकुनी करणाऱ्या संदिपान भुमरे यांना शिवसेनेने तब्बल पाच वेळा तुमच्या बातम्यांना कुणी हिंग लावून पुसत नाही!’