
गुंतवणुकीवर परताव्याच्या आमिषाने करुणा शर्मा-मुंडे यांची तब्बल 30 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमेनरातील तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत संभाजी भोसले (रा. डाबे वस्ती, कोंची, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग व प्रथमेश संतोष अभंग (दोघे रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ‘लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड’ नावाच्या कंपनीत पैसे गुंतवल्यानंतर दरमहा 45 हजार ते 70 हजार रुपये मिळवा, असे आमिष दाखवून संगमनेरच्या या तिघांनी करुणा शर्मा यांना 30 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. हा व्यवहार जानेवारी 2022 मध्ये झाला होता. मात्र, त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचे पैसे मिळाले नाहीत. चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली. बदनामीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे शर्मा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव तपास करीत आहेत.
























































