
तैवानवर सातत्याने लष्करी दबाव आणणाऱ्या चीनला अमेरिकेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकन नौदलाने तैवानच्या आखातात रविवारी आपल्या दोन अत्यंत धोकादायक आणि अत्यंत प्रगत आण्विक युद्धनौका तैनात केल्या. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीपासून चिनी सैन्य तैवानच्या अगदी जवळ लष्करी सराव करत आहे. या पार्श्वभूमीवर प्रथमच अमेरिकेने प्रत्युत्तर दिलेले रविवारी पाहावयास मिळाले. विशेष म्हणजे अमेरिकेच्या या कारवाईनंतर लगेचच चीनची वृत्ती थंडावताना दिसली आहे. रविवारी जेव्हा अमेरिकन युद्धनौका तैवान सामुद्रधुनीवर पोहोचली, तेव्हा चीनकडून सांगण्यात आले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. तणाव वाढवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.
तैवानच्या जल व हवाई क्षेत्रात चीनच्या लष्करी कवायती
‘पीएलए’ने (पीपल्स लिबरेशन आर्मी किंका आर्मी ऑफ चायना) तैवानभोवती 6 ‘नो एन्ट्री झोन’ घोषित केले आहेत. म्हणजेच आता या 6 मार्गांवरून कोणतेही प्रवासी विमान किंवा जहाज तैवानला पोहोचू शकणार नाही. चीनने आपली जे -20 लढाऊ विमाने आणि युद्धनौका तैवानच्या आसपास तैनात केल्या आहेत. चीनचे सैन्य उत्तर, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व तैवानच्या जलक्षेत्रात आणि हवाई क्षेत्रात लष्करी कवायती करत आहे.
चीनच्या आक्षेपानंतरही तैवानला शस्त्रपुरवठा
अमेरिकेने 1979 मध्ये चीनशी संबंध पूर्ववत केले. तैवानशी राजनैतिक संबंध तोडले गेले. मात्र, चीनच्या आक्षेपानंतरही अमेरिकेने तैकानला शस्त्र पुरवठा सुरूच ठेवला. अमेरिकाही वन चायना धोरणाला पाठिंबा देते. मात्र, तैवानच्या मुद्दय़ावर त्यांचे धोरण स्पष्ट नाही. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन या धोरणातून बाहेर पडताना दिसत आहेत. चीनने तैवानकर हल्ला केल्यास अमेरिका त्याच्या मदतीला येईल, असे त्यांनी अनेकदा आपल्या भाषणात सांगितले आहे. बायडेन यांनी तैवानसोबत अमेरिकन शस्त्रांची विक्री वाढवत ठेवली.



























































