
बलाढय़ हिंदुस्थानी नौदल संघाने अंतिम लढतीत आपले हॉकीतले कौशल्य प्रदर्शित करीत चॅम्पियन्स ट्रेनिंग सेंटर संघावर 8-1 अशी सहज मात करीत मुंबई हॉकी संघटना (एमएचएएल) आयोजित इंडिपेंडेन्स चषक हॉकी स्पर्धा दिमाखात जिंकली. मुंबईत चर्चगेट येथे ही स्पर्धा खेळवण्यात आली. नौदलाच्या रजत शर्माने अफलातून ड्रिबलिंगच्या खेळाचे दर्शन घडवत गोलांची अप्रतिम हॅटट्रिक साकारली. प्रशांत एसने 2 तर पावन राजभर, योगेश मलिक आणि आय. ई. पलंगाप्पा यांनी प्रत्येकी 1-1 गोल नोंदवला. चॅम्पियन्स ट्रेनिंग सेंटर संघाच्या वतीने केवळ मनप्रीत सिंगलाच 1 गोल नोंदवता आला. विजेत्या नौदल संघाला चषक आणि 15 हजार रुपये रोख तर उपविजेत्या चॅम्पियन्स ट्रेनिंग सेंटर संघाला चषक आणि 10 हजार रुपयांचे पारितोषिक मुंबई हॉकी संघटनेचे अध्यक्ष मंघा सिंग बक्षी यांच्या हस्ते देण्यात आले.































































