
बेस्टने अलीकडेच डिजिटलचा नारा देत नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड (एनसीएमसी) सेवा सुरू केली आहे. या कार्डवर सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना एका छताखाली आणण्यात आले आहे. त्यामुळे एकाच स्मार्टकार्डवर बेस्ट, रेल्वे व मेट्रोचे तिकीट काढण्याची सोय आहे. परंतु सध्या केवळ बेस्टचे तिकीट व पास काढता येत आहेत. त्यामुळे रेल्वे आणि मेट्रो सेवेला या कार्डशी संलग्न करण्याची आवश्यकता आहे.
बेस्टने देशात सर्वात आधी एनसीएमसी कार्ड माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लाँच केले होते. हे कार्ड अत्यंत फायदेशीर असून बसमध्ये बसून आपण रेल्वे, मेट्रो आदींचे तिकीट काढू शकतो. मुंबईत उपनगरीय रेल्वेनंतर बेस्टने सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांना सुटे पैसे जवळ बाळगावे लागणार तर नाहीत शिवाय बेस्ट व रेल्वे, मेट्रोसाठी स्वतंत्र ऍप डाऊनलोड करावे लागणार नाहीत. रेल्वेला विनंती केली आहे की, निदान रेल्वेचे यूटीएस ऍप तरी बेस्टच्या एनसीएमसी कार्डशी संलग्न करावे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
वन कार्ड ‘वन नेशन’ कधी…
बेस्टच्या अमृत महोत्सवी सोहळय़ात बेस्टच्या एनसीएमसी कार्डला इतर परिवहन सेवांशी जोडले जाईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्डसाठी एप्रिल महिन्यात सल्लागार निवडीसाठी निविदा काढली होती. या कार्डच्या ऑटोमेटीक फेअर कलेक्शन सिस्टमसाठीच्या तांत्रिक बाबीचा तपशील, आर्थिक मॉडेल आणि टेंडर व्यवस्थापन आदी कामांसाठी सल्लागार निवड होत असल्याचे एमआरव्हीसीने त्यावेळी स्पष्ट केले होते. सध्या रेल्वे आणि एमआरव्हीसी दोन्ही यंत्रणा यावर बोलण्यास तयार नाहीत.
दोन लाइफ लाइन, मग एकच कार्ड का नको?
सध्या बेस्टने दररोज सुमारे 24 ते 25 लाख प्रवासी प्रवास करतात. कोरोनापूर्व काळात हीच संख्या 34 ते 35 लाख प्रवासी इतकी होती. मध्य रेल्वेने सध्या सरासरी 34 लाख प्रवासी दररोज प्रवास करतात, तर कोरोनापूर्व काळात हीच संख्या 43 लाख इतकी होती. तर पश्चिम रेल्वेवर कोरोनापूर्व काळात दररोज 36 लाख प्रवासी प्रवास करायचे. आता पश्चिम रेल्वेवर 32 ते 33 लाख प्रवासी प्रवास करतात.
जपानच्या बुलेट ट्रेनचे डब्बे ‘शिंकासेन’ तयार करणारी कंपनी ‘हिताची’ हीने ब्ल्यू टुथ सेन्सर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करीत एका ‘360 पॅस’ नावाच्या मोबाईल ऍपची निर्मिती केली आहे. इटलीच्या जिनोआ शहराच्या महानगरपालिकेच्या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांचे पेमेंट या ऍपद्वारे होत आहे. ब्ल्यू टुथ सेन्सरमुळे प्रवाशांनी बोर्डिंग केले की संगणकाला लागलीच समजते आणि भाडे ऍपमधून आपोआप वगळले जाते.






























































