
दिल्लीतील मद्य धोरणावरून आप सरकार आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष वाढला असतानाच आता सीबीआय आणि आपमध्येही संघर्ष होत आहे. आतापर्यंत या प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच सिसोदिया यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली होती. ही कारवाई तब्बल 14 तास सुरू होती. आता त्यानंतर सीबीआय सिसोदिया यांचे बँक लॉकर तपासणार आहे.
मंगळवारी सीबीआय आपले बँक लॉकर तपासण्यासाठी येणार असल्याची माहिती सिसोदिया यांनी ट्विटरवर दिली. सीबीआयने 19 ऑगस्टला आपल्या घरावर धाड टाकली. 14 तासांच्या या कारवाईत त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आता बँक लॉकरमध्येही त्यांना काहीही मिळणार नाही. तरीही सीबीआयचे स्वागत आहे. त्यांना तपासात आपण आणि आपले कुटुंबिय पूर्ण सहकार्य करू, असे सिसोदिया यांनी सांगितले.
सीबीआयकडूनही सिसोदिया यांच्या बँक लॉकरची तपासणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ठराविक प्रक्रियेनुसार ही तपासणी करण्यात येणार आहे. तपासवेळी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य उपस्थित राहणार आहे, असे सीबीआयने म्हटले आहे. भाजपकडून आप सरकारवर भ्रष्टाराचे आरोप होत असतानाच तपास यंत्रणाही धाडसत्र चालवत आहेत.
मद्य धोरणावरून वाद सुरू असतानाच आप सरकार आणि उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यातही संघर्ष होत आहे. सक्सेना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आपचे आमदार रात्रभऱ विधानसभेत धरणे आंदोलन करणार आहे. खादी ग्रामोद्योगमध्ये व्ही.के. सक्सेना चेअरमन असताना नोटाबंदीच्या काळात अनेक जुन्या नोटा बदलण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच आप आणि सक्सेना यांच्यात मद्य धोरणासह इतर मुद्यावर मतभेद आहेत. त्यामुळे आपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


























































