
कोकणातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड जामसंडे शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. मंगळवारी विशेष गणपती बाजाराचे नियोजन देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते. आठवडा बाजाराला मंडपीसाठी लागणारे साहित्य, फळा फुलांनी देवगड जामसंडे बाजारपेठ फ़ुलून गेली होती. गेली दोन वर्षे कोरोना, महापुराच्या संकटाचा नागरीक व व्यापारी सामना करीत आहे. यावर्षी लाडक्या गणरायाचे जल्लोषी स्वागतसाठी व्यापारी ,नागरिक,चाकरमानी देवगड बाजारपेठे खरेदी करताना दिसत होते. देवगड जामसंडे बाजारपेठेत मालाचा चांगला दर्जा, माफक दरामुळे तालुक्यातील ग्राहक पुर्वीपासून येत असून ग्राहकांची व व्यापारी लगबग दिसत होती.
देवगड बाजारपेठ बागायतदार ,मच्छिमार यांचेवर अवलंबून असल्याने या बाजारपेठत ग्रामीण भागातील शेतकरी, छोटे विक्रेते माटोळीसाठी लागणारे साहित्य आंब्याचे टाळ, नारळ, शिप्टा , काकडी, हराण, कौंडाळ, कांगणे , कांगले,सरवड , ऐनाची फळे, तेरडा, नरमाची फळे, नागकुड्याची फळे ही जंगलातून आणून त्याची विक्री करतात. मंडपीसाठी लागणारे साहित्य, फळा फुलांनी बाजारपेठा फ़ुलून गेल्या आहेत. तसेच गावठी पडवळ, भेंडे, चिबुड, काकडी, वाल आणि अन्य भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
गणेशोत्सवात कोकणची एक वेगळीच संस्कृती आहे. निसर्गात आढळणाऱ्या वनस्पती वापरून मंडपी सुंदर सजवली जाते. आता या वनस्पती बाजारात सहज उपलब्ध होत असल्याने चाकरमानी ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत होते. स्थानिक दुकानांमधून सजावटीचे साहित्य कंठीहार, तोरणे, फुलांच्या रंगीबेरंगी माळा व अन्य वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ग्राहक खरेदी करीत आहेत. देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुकीची कोंडी तसेच स्थानिक बाजारावर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासनाकडून योग्य नियोजन ,पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईकर चाकरमानी देवगड व आजूबाजूच्या परिसरात दाखल झाले असून मंगळवारी सकाळ पर्यंत सुमारे 30 जादा एसटी बसेस मधून चाकरमानी देवगड बसस्थानकावर दाखल झाले आहेत. मुंबईकर चाकरमानी यांची प्राथमीक आरोग्य तपासणी,साथीचे रोग तपासणी करीता देवगड आरोग्य विभागामार्फत विशेष आरोग्य तपासणी कक्ष देवगड बसस्थांनकवर कार्यरत आहे.































































