मनसे पदाधिकाऱयाची महिलेला मारहाण, तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या केमिस्टच्या दुकानासमोर  बॅनर लावण्यास विरोध करणाऱया एका 57 वर्षीय महिलेला मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱयांनी धक्काबुक्की व मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून दादागिरी करत महिलेवर हात उचलणाऱया विनोद अरगिले, राजू अरगिले आणि संदीप लाड या मनसे पदाधिकाऱयांना ताब्यात घेतले आहे.

कामाठीपुरा 8 वी गल्ली येथे प्रकाश देवी या महिलेचे बंद  केमिस्टचे दुकान आहे. त्या दुकानाबाहेर गणेशभक्तांच्या स्वागताचे बॅनर लावण्यासाठी मनसे पदाधिकारी विनोद अरगिले, राजू अरगिले हे बांबू उभारत होते. मात्र प्रकाश देवी यांनी दुकानासमोर बॅनर लावण्यास विरोध करत बांबू काढण्यास सांगितले. यावरून विनोद, राजू आणि संदीप यांनी  प्रकाश देवी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. इतक्यावर न थांबता विनोद अरगिले याने याने प्रकाश देवी यांना थेट धक्काबुक्की करत मारहाण केली व जमिनीवर ढकलून दिले. 28 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. त्यावेळी प्रकाश देवी यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र घटनेच्या व्हिडीओतून खरा प्रकार उघडकीस येताच नागपाडा पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून  विनोद अरगिले  व अन्य तिघांविरोधात भादंवि 323, 337, 352, 355, 504, 506, 509,34 कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतल्याचे नागपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले.