
मुंबईकरांना आपले बेस्टचे वीज बिल आता ‘क्यूआर’ कोड मोबाईलने स्कॅन करताच झटपट ऑनलाईन भरता येणार असून बेस्टच्या मुंबईतील दहा लाख वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या हस्ते वीज देयकाचे प्रदान सुलभतेने करणाऱया ‘डायनॅमिक क्यूआर कोड’चे लोकार्पण करण्यात आले.
टीजेएसबी बँक आणि बेस्ट उपक्रमाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घेत वीज ग्राहकांसाठी ‘क्यूआर’कोड द्वारे वीज देयकांचे प्रदान डिजिटल माध्यमातून करण्याची सोय उपलब्ध केली आहे. बेस्टचे साडेदहा लाखांपेक्षा अधिक वीज ग्राहक आहेत. बिल पेमेंटचा वेळ कमी करण्याच्या कामी ‘क्यूआर कोड’चा निश्चित उपयोग होऊ शकतो. बिल काऊंटरवर क्यूआर कोड स्कॅन करून वीज ग्राहकांना देयकाचे प्रदान करता येऊ शकणार आहे.



























































