
ब्रह्मांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. यापैकी काही रहस्यांचा शोध आपल्याला लागलेला असला तरी अशी अनेक रहस्ये आहेत, जी अजूनही मानवाच्या आवाक्यात आलेली नाहीत, खगोलशास्त्रज्ञांनी नुकताच एक ग्रह शोधून काढला आहे. पृथ्वीपेक्षा आकाराने 70 टक्के मोठा असलेला हा ग्रह ‘एक्सोप्लॅनेट’ म्हणजेच आपल्या सूर्यमालेबाहेरील ग्रह आहे. शास्त्रज्ञांनी याला ‘TOI-1452’ असे नाव दिले आहे.
पृथ्वीपेक्षा आकाराने मोठा असलेला हा ग्रह पृथ्वीपेक्षा वजनाने पाच पट जडदेखील आहे. विशेष म्हणजे या ग्रहाचा संपूर्ण पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे; त्यामुळे याला ‘ओशन प्लॅनेट’ असेदेखील म्हणले जात आहे. ब्रह्मांडातील सर्वात मोठा असा हा महासागर आहे असादेखील एक दावा करण्यात येत आहे.
पृथ्वीपासून 100 प्रकाशवर्षे अंतरावर असलेला हा ग्रह दोन ताऱयांभोवती फिरतो आहे. या पाण्याच्या खाली काही खडकाळ भाग असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अगदी पृथ्वीसारखा भासणारा हा ग्रह ‘सुपर अर्थ’ म्हणून जोरदार चर्चेत आलेला आहे. पृथ्वी 70 टक्के पाण्याने व्यापलेली आहे, मात्र वस्तुमानाचा विचार करता हे प्रमाण अवघे एक टक्के आहे, तर ‘TOI-1452’ असलेल्या महासागराचा वाटा एकूण वस्तुमानाच्या 30 टक्के आहे.
विशेष म्हणजे, हा ग्रह केवळ 11 दिवसांत सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे इथे एक वर्ष हे केवळ 11 दिवसांचे असते. या ग्रहावरील पाण्याचा अजून अभ्यास करण्याची गरज असून, त्यासाठी संशोधक आता ‘जेम्स वेब टेलिस्कोप’च्या मदतीने त्याचा तपशीलवार अभ्यास करण्याची शक्यता आहे. हा तारा तेजस्वी आहे आणि मुख्य म्हणजे खगोलशास्त्राच्या दृष्टीने 100 प्रकाशवर्षे हे काही फार मोठे अंतर नाही. विविध मतमतांतरे आणि शक्यतांचा सध्या विचार केला जात आहे.






























































