
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
काही व्यक्ती Image Conscious म्हणजेच स्व-प्रतिमेला प्रचंड जपणाऱया असतात. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची नकारात्मकता जी त्यांच्या ‘स्व’ला बाधक ठरेल असे त्या सहन करू शकत नाहीत. या व्यक्तींना जरी त्यांच्या कमकुवत बाजू माहीत असतील तरीही त्या जाणीवपूर्वक बाहेर कोणालाच दाखवून देत नाहीत. आतल्या आत मानसिक त्रास सहन करत असतात आणि आवाक्याबाहेरील गोष्टी करायला जातात. यात जरा काही चूक झाल्यास त्यांना स्वतःला कुठेतरी कमी असल्यासारखं वाटतं आणि मग ते अतिविचारांच्या दुष्टचक्रात अडकतात.
ही गोष्ट आहे एका आईची. घरातल्या सगळ्यांना सांभाळून घेणारी अशी ही आई. त्यांना हवं नको ते बघणारी. या आईचं पूर्ण आयुष्य हे घडय़ाळाच्या काटय़ावर चालू होतं. तिचा दिवस पहाटे पाच वाजता चालू व्हायचा आणि रात्री अकरा वाजता संपायचा. नवरा, ती आणि दोन मुली असं तिचं चौकोनी कुटुंब होतं. तिच्या दोन्ही मुली शाळेत जाणाऱया होत्या. नवरा बिझनेसच्या निमित्ताने बराच वेळ घराबाहेर असायचा. त्यामुळे तिलाच मुली आणि घर अशा दोन्ही आघाडय़ा सांभाळाव्या लागत होत्या. आई हे सर्व न कंटाळता, न चिडचिड करता सांभाळून घेत होती.
‘मला स्वतःसाठी तुमचा गाईडन्स पाहिजे,’ आईने समुपदेशनाचे कारण सांगून टाकले. ‘मी आयुष्यात सेटल आहे. पण अजूनही माहेरच्या जबाबदाऱयांतून मोकळी झालेली नाही. माहेर आणि माहेरची माणसं म्हटलं तर विचार करूनच मला दडपण येतं. आज माझ्या लग्नाला पंधरा वर्षं होतील. तरीही मला माहेरच्या माणसांची विशेषतः माझ्या आईची मर्जी सांभाळावी लागते. तिच्याशी फोनवर रोज मला बोलावंच लागतं आणि ती दहा मिनिटं माझ्यासाठी पूर्ण उदासीन करणारी असतात. कारण तिच्या सगळ्यांविषयीच्या तक्रारी ऐकून घ्याव्या लागतात. या तिच्या कटकटीमुळे मला त्रास होतो. बरं! तसं तिला बोलूनही चालत नाही. सगळं निमूटपणे ऐकावेच लागतं. यामुळे मला आईशी बोलताना मेडीटेशन करून मगच बोलावं लागतं. नाहीतर माझा पूर्ण दिवस वाईट जातो.’ एक आई आपल्या आईबद्दल बोलत होती.
आपल्या गोष्टीतल्या आईचं नाव सुलभा (नाव बदलले आहे) आहे. सुलभाची खरी समस्या होती – ‘नाही’ म्हणता न येणं आणि ‘स्वतःला परिपूर्ण बनवणं.’ या दोन समस्यांपैकी महत्त्वाची समस्या होती ‘नाही म्हणता न येणं.’ कोणालाही ती नाही म्हणू शकत नव्हती. यामुळेच की काय, ती माहेरच्यांमध्येही अडकून पडली होती. सुलभावर आणि तिच्या भावांवर त्यांच्या आईचा प्रचंड पगडा होता. आईची कोणतीही गोष्ट ते खाली पडू देत नसत; कारण त्यांच्या आईने एकटीने त्यांचं संगोपन केले होते. सुलभाचे वडील हे तिच्या वयाच्या दहाव्या वर्षीच वारले होते. त्याची जाणीव सर्व मुलांना होती आणि त्यांच्या आईने हे सतत त्यांना बोलून दाखवले असल्याने सर्वचजण तिच्या अवतीभवती असायचे. या सर्वांना आईच्या मर्जीप्रमाणे वागावे लागायचे. अन्यथा ती नाराज व्हायची आणि सगळ्यांशी अबोला धरायची.
जेव्हा केव्हा तिच्या आईला तिची गरज असायची तेव्हा सुलभाचे भाऊ तिला माहेरी बोलवायचे आणि ही तडक माहेरी जायची. माहेर आणि सासर एकाच भागात असल्यामुळे ती दोन्ही ठिकाणी धावपळ करायची. बरं! एवढं सगळं सांभाळूनही तिची आई छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर नाराज व्हायचीच. मग तिला खूश करण्यासाठी सुलभाचे प्रयत्न चालू व्हायचे. नवरा आणि मुली काही बोलत नव्हते, कारण त्यांना तिची ओढाताण लक्षात यायची.
‘मॅडम, मी नाही का म्हणू शकत नाही?’ सुलभाने तिची समस्या लक्षात आल्यावर प्रश्न विचारला. सुलभासारखी आज बरीच उदाहरणं आपण आजूबाजूला किंवा आपल्याही घरांत बघतो, ज्यांना ही समस्या असते आणि यामुळे अशा व्यक्ती भरपूर त्रास सहन करतात.
या व्यक्तींचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की, या व्यक्ती Image Conscious म्हणजेच स्व-प्रतिमेला प्रचंड जपणाऱया असतात. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची नकारात्मकता जी त्यांच्या ‘स्व’ला बाधक ठरेल असे त्या सहन करू शकत नाहीत. या व्यक्तींना जरी त्यांच्या कमकुवत बाजू माहीत असतील तरीही त्या जाणीवपूर्वक बाहेर कोणालाच दाखवून देत नाहीत. आतल्या आत मानसिक त्रास सहन करत असतात आणि आवाक्याबाहेरील गोष्टी करायला जातात. अशातच दुसऱया व्यक्तीने जर का काही त्यांना सांगितले किंवा तशी अपेक्षा केली तर ती त्यांना जणू काही शिरसावंद्य असते. ते काम ती करतातच करतात. यात जरा काही चूक झाल्यास त्यांना स्वतःला कुठेतरी कमी असल्यासारखं वाटतं आणि मग ते अतिविचारांच्या दुष्टचक्रात अडकतात. या व्यक्तींच्या स्वभावाचा दुसरा पैलू असतो तो म्हणजे ‘परिपूर्ण बनण्याची पराकाष्ठा करणे.’ हा सगळ्या बाबतीत परिपूर्ण बनण्याचा त्यांचा प्रयत्न अजून ताणामध्ये ढकलतो.
‘मग मी कसं स्वतःला बदलू?’ सुलभाने विचारलं. तिच्यासाठी स्वतःला बदलणं काही कठीण नव्हतं. पण, सहजही नव्हतं. तिला सांगितलेले उपाय हे तिच्यासाठी आव्हानात्मक होते. कारण तिला स्वतःला अमूलाग्र बदलायचं होतं. इतरांना, विशेषतः आईला ते जाणवू द्यायचं होतं. सुलभाने सर्वप्रथम स्वतःला प्राधान्य देण्यास सुरुवात केली. योग-साधना, छंद आणि कुटुंब अशी तिची दिनचर्या तिने आखून घेतली. दुसरा महत्त्वाचा बदल तिला स्वतःमध्ये घडवून आणायचा होता तो म्हणजे इतरांच्या नकारात्मक टीकांकडे तटस्थ पध्दतीने पाहणे किंवा जमल्यास दुर्लक्ष करणे. तिच्या आईबाबत तिला हे जमण्यास थोडं अवघड गेलं, कारण ती आईमध्ये भावनिकरीत्या गुंतली होती.
सुरुवातीला तिच्या आईमध्ये आणि तिच्यात खटके उडालेही. पण यापुढे कोणतीही नकारात्मकता अंगाला लावून घ्यायची नाही, तसंच स्वतःच्या आत्मसन्मानासाठी स्वतःच उभं राहायचं हा चंग मात्र सुलभाने बांधला असल्यामुळे ती तिच्या ठरवलेल्या मार्गावरून हटली नाही. हळूहळू का होईना, तिने तिच्या आईला काही गोष्टींची जाणीव करून दिली. आज सुलभावर तिचा नवरा जास्त खूश आहे… त्याला त्याची ‘झाशीची राणी’ पुन्हा सापडली आहे. सुलभा स्वतःवर खूश आहे, कारण तिला आता ‘नाही’ म्हणता यायला लागलं आहे. तिची आई आता तिच्याकडेही वरच्यावर यायला लागली आहे.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)



























































