केएल राहुलची देहबोली पाहून वाटते की तो काहीही करू शकत नाही, आरपी सिंगचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशिया चषक 2022 मध्ये हाँगकाँगचा पराभव करून सुपर-4 मध्ये स्थान मिळवणारा हिंदुस्थानी संघ रविवार 4 सप्टेंबर रोजी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या स्पर्धेत दुसऱ्यांदा पाकिस्तानशी भिडणार आहे. याआधी झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने दुबईत पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला होता. अ गटातील दोन्ही सामने जिंकून हिंदुस्थानी संघ सुपर-4 साठी पात्र ठरला. दुसऱ्या सामन्यात हिंदुस्थानने हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी निवडण्यात आलेली प्लेइंग इलेव्हन समोर आल्यानंतर चाहत्यांना तसेच क्रिकेट तज्ज्ञांनाही धक्का बसला. या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून ऋषभ पंतला वगळण्यात आले होते. पंत हा हिंदुस्थानी T20I संघाचा अविभाज्य सदस्य आहे पण गेल्या आठवड्यात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या जागी दिनेश कार्तिकचा समावेश करण्यात आला होता, त्यामुळे ऋषभ पंतच्या जागेवरून वाद सुरू झाला होता.

विशेष म्हणजे पुढच्याच सामन्यात त्याचा हाँगकाँगविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. हार्दिक पंड्याच्या जागी त्याला संधी देण्यात आली आणि दिनेश कार्तिक संघात असूनही पंत विकेट कीपिंग करताना दिसला. हिंदुस्थानचा माजी गोलंदाज रुद्र प्रताप सिंग याने पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पंतला केएल राहुलच्या जागी संघात संधी द्यायला हवी असे म्हटले आहे.

आरपी सिंगने इंडिया टीव्हीला प्रतिक्रिया देताना म्हटले की, “दिनेश कार्तिक आणि केएल राहुलपैकी एकाला विश्रांती देण्याची गरज आहे आणि पंत प्लेइंग इलेव्हनमध्ये असणे आवश्यक आहे. पंत संघात खेळण्यास पात्र आहे. तो मॅचविनर खेळाडू असून त्याने चांगली कामगिरी केल्यास तो हिंदुस्थानला विजयापर्यंत नेऊ शकतो.

तो पुढे म्हणाला, डीकेने शेवटच्या सामन्यात विकेट किपींग केली न केल्यामुळे मी थोडा गोंधळलो होतो. कारण त्याने पहिल्या सामन्यात किपींग केली होती. राहुल आणि कार्तिक यांच्यात निवड करण्याच्या प्रश्नावर आरपी म्हणाला की केएल राहुलची देहबोली जास्त आत्मविश्वास दर्शवत नाही. जेव्हा मी त्याची देहबोली पाहतो तेव्हा असे दिसते की तो काहीही करू शकत नाही. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी वेळ हवा आहे.