लेख – शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख पैलू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्र. ह. दलाल

शिक्षकाची जीवननिष्ठा, त्याची स्वतःच्या व्यवसायाकडे पाहण्याची दृष्टी आणि त्याचा विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हेच शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख पैलू आहेत. शिक्षकाला स्वतःचे तत्त्वज्ञान हवे. त्याशिवाय त्याच्या मनाला, विचारांना स्थिरता येणार नाही. आपण करीत असलेले कार्य हा केवळ व्यवहार, उदरभरणाचा व्यवसाय याहून अधिक काहीतरी आहे, असा विश्वास व निष्ठा शिक्षकात हवी. शिक्षकाच्या व्यवसायाचे काही वेगळेपण आहे. त्याच्या कार्याचे परिणाम दूरगामी असतात. शिक्षकाची शक्ती, सामर्थ्य अफाट आहे. दुर्दैवाने आज शाळा–महाविद्यालये म्हणजे केवळ माहितीची दुकाने आणि शिक्षक म्हणजे माहितीचे विव्रेते झाले आहेत.

आपला हिंदुस्थान गरीब असला तरी आधुनिक प्रगत राष्ट्रांनाही मार्गदर्शन करू शकेल अशा जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा अमोल ठेवा आपल्या जवळ आहे. हजारो वर्षांपासून काही उदात्त जीवनमूल्ये आपण प्राणपणानं जपली आहेत, रुजविली आहेत, पण अलीकडे मात्र आपण ‘अल्ट्रामॉडर्न’ होत आहोत. टीव्ही, चित्रपटांतून आपली जीवनमूल्ये कालबाह्य ठरविली जात आहेत. अशा वेळी शिक्षकांवर फार मोठी जबाबदारी आहे. आज आपण एका संक्रमण अवस्थेतून जात आहोत. जुनं टाकवत नाही, नवं सोसवत नाही अशी आपली अवस्था होत चालली आहे. दिवसेंदिवस पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण वाढत आहे. अंधानुकरणाचे ‘फॅड’ वेगाने पह्फावत आहे. विरुद्ध दिशेने येणारा वारा सोसाटय़ाचा आहे. वारा नव्हे, ते तुफान आहे. आपली संस्कृती, आपली अस्मिता उद्ध्वस्त करणारी ती त्सुनामी आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते,

अंधाराचे दिवस येताहेत,

दिवा दिवा जमवायला हवा

अर्थात हे आव्हानही आपण स्वीकारू शकू. मात्र त्यासाठी शिक्षक सतत जागृत व चिंतनशील राहिला पाहिजे. केवळ शिक्षक आणि शिक्षकच हे आव्हान स्वीकारू शकेल! मूल्यांचे, संस्कारांचे ढासळते बुरुज पुनश्च उभे व्हायला हवेत असं सर्वांनाच वाटतं, पण कोण समर्थपणे हे करू शकेल! शाळा अन् शिक्षकांकडेच पुन्हा अंगुलीनिर्देश करावा लागेल! आज शिक्षकी पेशाला उपरोध, उपहासाने ‘मास्तरकी’ म्हणून हिणवले जात असले तरी राष्ट्राच्या भाग्योदयाची तीच खरी ‘मास्टर की’ आहे हे विसरून चालणार नाही! वेदातही शिक्षकाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे…

त्वं नो अस्या अमतेरूत क्षुधो,

अभिशस्तेख स्पृधि।

त्वं न ऊति तव चित्रया

धिया शिक्षा शचिष्ठ गातुवित।।

हे शक्तीशाली मार्गशोधका, आमचे अज्ञान, आमची भूक आणि आमचे रोग दूर करण्याचा मार्ग तू आम्हाला दाखव. तुझी बुद्धी, रक्षणशक्ती, उत्पादनशक्ती तू प्रकट कर. कालौघात शिक्षक व्यवसायात अनेक परिवर्तने झालीत. ती लक्षात घेऊनही असे म्हणावेच लागेल की, शिक्षकाची जीवननिष्ठा, त्याची स्वतःच्या व्यवसायाकडे पाहण्याची दृष्टी आणि त्याचा विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हेच शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख पैलू आहेत. शिक्षकाला स्वतःचे तत्त्वज्ञान हवे. त्याशिवाय त्याच्या मनाला, विचारांना स्थिरता येणार नाही. आपण करीत असलेले कार्य हा केवळ व्यवहार, उदरभरणाचा व्यवसाय याहून अधिक काहीतरी आहे, असा विश्वास व निष्ठा शिक्षकात हवी. शिक्षकाच्या व्यवसायाचे काही वेगळेपण आहे. त्याच्या कार्याचे परिणाम दूरगामी असतात. शिक्षकाची शक्ती, सामर्थ्य अफाट आहे. एखादाच ‘चाणक्य’ राज्यक्रांती घडवू शकतो ना? दुर्दैवाने आज शाळा-महाविद्यालये म्हणजे केवळ माहितीची दुकाने आणि शिक्षक म्हणजे माहितीचे विव्रेते झाले आहेत.

कालच शिक्षक दिन झाला. हिंदुस्थानात शिक्षकांप्रति आदर व्यक्त केला गेला. पण त्यानिमित्ताने कोणी आत्मपरीक्षण केले का? मीसुद्धा एक शिक्षकच आहे. मग करू या का आपण आत्मपरीक्षण!

पाहावे आपणांसी आपण

काढूनी चष्मा डोळ्यांवरचा

खरंच मी ‘शिक्षक’ आहे? की, दिलेल्या वेळापत्रकाचा धनी? शासनाने ठरवून दिलेल्या ठरावीक अभ्यासक्रमाची, ठरावीक पद्धतीने पोपटपंची करणारा निर्विकार पुतळा की सळसळत्या चैतन्यरूपी बालब्रह्माला घडविणारा शिल्पकार? ‘शिक्षकी’ हा पेशा म्हणून मी स्वीकारलाय की ‘धंदा’ म्हणून? शिक्षकी हे व्रत म्हणून मी मानतो? आपल्या मनालाच उत्तरे देऊ या! अंतःकरणाच्या आरशात डोकावूया! समर्थांच्या शब्दात थोडा बदल करून असे म्हणावेसे वाटते, ‘सामर्थ्य आहे अध्यापनाचे। जो जो करील तयाचे, परंतु अस्मितेचे। अधिष्ठान पाहिजे।।’

बा, शिक्षका, स्वतःला विचार मी कोण? मी कोणासाठी? माझे काम काय? माझा खरा आनंद कशात आहे? मित्रांनो, या प्रश्नांच्या उत्तरांनी आपल्या मनात अधूनमधून येणारी मरगळ नाहीशी होऊन मनाला  उभारी येईल. भावी पिढीच्या भक्कम रचनेसाठी प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे. मी ते करू शकतो. माझे आणि विद्यार्थ्यांचे काही आंतरिक नाते आहे ही जाणीवच आपले अध्यापन कार्य अर्थपूर्ण करू शकेल या माझ्या मताशी तुम्हीही नक्कीच सहमत असाल.