आरोपीचा युक्तीवाद सरकारी पक्षाने खोडून काढला, पुढील सुनावणी 16 सप्टेंबरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेखा जरे खून खटल्यात आरोपींचा काही संबंध नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी आज न्यायालयात केला. सरकारी पक्षाच्या वतीने यावर आक्षेप घेत वेळोवेळी आलेले एकमेकांचे संबंध व पुरावे न्यायालयासमोर मांडले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांनी पुढील सुनावणी 16 सप्टेंबरला ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हैदराबाद येथून अटक केलेले याच खटल्यातील चार आरोपी आज न्यायालयासमोर हजर झाले.

आरोपी जनार्दन अकोला, राजे शेखर चकाली, शेख इस्माईल शेख, अब्दुल रहमान अब्दुल आरिफ अशी न्यायालयासमोर हजर झालेल्या आरोपींची नावे आहेत. यशस्विनी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांचा नगर-पुणे महामार्गावर खून करण्यात आला होता. या घटनेमध्ये येथील पत्रकार बाळ बोठे हा मुख्य आरोपी आहे. त्याने दिलेल्या सुपारीनंतर हे हत्याकांड झाल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. मागील सुनावणीवेळी काही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले होते. आज या प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात आलेली होती.

या हत्याकांडामधला आरोपी आदित्य चोळके हा सातत्याने गैरहजर राहत होता. आज तो वकिलामार्फत न्यायालयात हजर झाला. न्यायालयामध्ये बाजू मांडताना त्याच्या वकिलाने ‘आमचा या हत्याकांडाशी कोणताही संबंध नाही’ असे सांगून चोळके यांच्या घरामध्ये जे पैसे सापडलेले आहेत, ते पैसे कर्ज स्वरूपामध्ये घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्याचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केला. याला सरकारी पक्षाचे वकील उमेशचंद्र यादव यांच्या वतीने वकील सचिन पटेकर यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली. चोळके हा या घटनेशी संबंधित आहे. 24 नोव्हेंबर 2020 रोजी हे सर्वजण एकत्र भेटलेले होते, त्याचे पुरावे दोषारोप पत्रामध्ये दिलेले आहेत. तसेच घटना घडण्यापूर्वी त्यांच्यात संभाषणसुद्धा झाले असून, हे एकमेकांच्या संपर्कात कायमच राहिलेले आहेत. सुपारी घेऊनच जरे यांची हत्या केली आहे. या घटनेमध्ये वापरलेले हत्यार आरोपींकडून हस्तगत केले आहे. या घटनेमध्ये जी गाडी वापरली तीसुद्धा यांच्याच नावावर आहे, त्यामुळे यांचा घटनेशी संबंध नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी ठेवण्याचे आदेश दिले.