मुंबईतील घसरत चाललेला मराठी टक्का वाढीस लागावा, यासाठी गिरणी कामगारांसह सर्व कष्टकरी जनतेला त्या ठिकाणी घरे देणे आवश्यक आहे. यासाठी राज्यभरात गिरणी कामगारांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येत असून, त्यानंतर मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे. अलीकडचे राजकीय वातावरण पाहता, मुंबई तोडण्याचा डाव आखला जाऊ शकतो. तो डाव राज्यातील मराठी माणूस उधळून लावेल, असा विश्वास कॉ. अतुल दिघे यांनी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी शंकर पाटील, तसेच सर्व श्रमिक संघटना, क्रांतिवीर भगतसिंह ब्रिगेड, श्रमिक महिला मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कॉ. दिघे म्हणाले, ‘‘संपानंतर मंबईतील गिरणी कामगार देशोधडीला लागला. गिरण्यांच्या जागी सध्या गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत असून, त्यात मराठी माणसाला स्थान मिळत नाही. उदासीनतेमुळे मुंबईतील मराठी टक्का घसरत चालला असून, ते धोकादायक आहे. राहण्याची जागा नसल्याने मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जात आहे. हे टाळण्यासाठी गिरण्यांच्या जागी होणाऱया गृहप्रकल्पात गिरणी कामगारांसह राज्यातील मराठी माणसांना घरे मिळणे आवश्यक आहे. राहण्याच्या जागेचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर मराठी माणूस मुंबईत स्वाभिमानाने व्यवसाय करेल.’’
आजमितीस 1800 एकर जागा गिरण्यांच्या ताब्यात असून, त्या ठिकाणी राज्यातील कष्टकऱयांना 10 लाखांत छोटे घर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. यासाठीच आम्ही सह्यांची मोहीम राबवीत आहोत. मराठी माणसांनी पाच पिढय़ा खपून मुंबई घडविली आहे. कष्टकरी, सर्वसामान्यांच्या घामावर उभारलेल्या मुंबईचे राजकारण सध्या बिल्डरांच्या खिशात आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास राज्यकर्ते टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही कॉ. दिघे यांनी यावेळी केला.






















































