
मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या सांगली जिह्यातील कैद्याने येथील मध्यवर्ती कळंबा कारागृहात कापडी पट्टीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे समोर आली. भरत बाळासाहेब घसघसे (वय 29, रा. वाडकर गल्ली, आष्टा, जि. सांगली) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. या घटनेने कारागृह प्रशासन हादरले असून, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
मारामारीसह बेकायदा शस्त्र्ाs बाळगल्याप्रकरणी भरत घसघसे विरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. सन 2019 मध्ये त्याच्यासह सहा साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सध्या त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली होती. त्याला सर्कलमध्ये ठेवण्यात आले होते. आज पहाटे घसघसे याने शौचालयालगत भिंतीजवळ कापडी पट्टीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला.
दरम्यान, कळंबा कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱयांसह जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जाधव यांच्यासह अधिकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी केली.































































