निसर्गजागर – चित्ता स्थिरावणार…?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> यादव तरटे–पाटील

एकीकडे हिंदुस्थान स्वतंत्र झाला तर दुसरीकडे शेवटचा चित्ता हिंदुस्थानात मारला गेला. मात्र त्याच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तब्बल 75 वर्षांनी आफ्रिका खंडातील नामिबियामधील चित्ता मध्य प्रदेशातील कुनो जंगलात पुनर्स्थापित करण्याच्या प्रकल्पाला वेग आलाय. हिंदुस्थानातील आशियाई प्रजातींचा चित्ता आधी आपण संपवला. आफ्रिकन चित्ता आपल्याकडे स्थिरावेल का? चित्त्यासाठी लागणारा योग्य अधिवास आपण जपलाय का? असे एक ना अनेक प्रश्न आज यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

सन 1935च्या दरम्यान हिंदुस्थानात औद्योगिकीकरण व आधुनिकीकरणाचे वारे सुसाट वाहू लागले होते. इंग्रजांनी कापसाची शेती व आनुषंगिक आधुनिकीकरणाचे बीजारोपण आधीच केलेले होते. कापसाच्या शेतीसाठी लागणारी पठारी जमीन झपाटय़ाने शेतीमध्ये रूपांतरित होत होती. चित्त्यांचा अधिवास झपाटय़ाने आपुंचन पावत होता. तत्पूर्वी सोळाव्या शतकापासूनच चित्त्यांचीही मोठय़ा प्रमाणात शिकार होत होती, तर चित्त्यांचे मुख्य खाद्य असलेल्या काळवीटांचीही शिकार होत होतीच. भरमसाट वाढणारी लोकसंख्या व त्यातून फुगणारी खेडय़ांची व शहरांची लोकसंख्या ही माळराने व जंगलक्षेत्र गिळायला लागली, तर दुसरीकडे कृषीप्रधान देश असलेल्या आपल्या देशात पशुधनालाही अधिक महत्त्व होतेच. यातून गवती कुरणांचे गायरानात होणारे रूपांतर व स्थानिकांचे माळराने व निसर्गसंपत्तीवर असलेले संपूर्ण अवलंबित्व अशी सर्व साखळी वाढायला लागली. देशाचं सगळं लक्ष केवळ मानवी विकासावर केंद्रित झालं असताना चित्ता संपतोय यावर कुणाचं लक्ष नव्हतं. सन 1951 मध्ये सुरुवात झालेल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून शाश्वत ते आजवर विकासाची गुरुकुल्ली कायम दुर्लक्षित राहिली. कोणत्याही दुर्लक्षाचा विपरीत परिणाम हा होतच असतो. हिंदुस्थानातही नेमकं तेच झालं. अगदी कमी कालावधीत सन 1952 मध्ये हिंदुस्थानातून चित्ता प्राणी नामशेष होण्याची नामुष्की आपल्यावर ओढवली. मानव विकासासाठी अत्यावश्यक असणारे औद्योगिकीकरण, झपाटय़ाने कमी होणारा अधिवासाचा आकार, अधिवासाचे होणारे विखंडन, चित्त्यांची व त्यांना लागणाऱया खाद्याची वाढलेली शिकार यातून चित्ता नामशेष झाला. सन 1948 मध्ये नैसर्गिक अधिवासातील चित्ता नामशेष झाला असताना सन 1971 मध्ये वाघांचाही क्रमांक लागणार असे चित्र उभे झाले. मात्र सन 1972 मध्ये वन्य जीव संरक्षण कायदा व 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प आल्यामुळे आज वाघाला मोकळा श्वास घेता येतोय. केवळ मानवी विकासाभोवती पेंद्रिभूत झालेल्या तत्कालीन नियोजनकर्त्यांच्या दृष्टीने चित्ता नामशेष होणे महत्त्वाचे वाटले नसावे. सन 1952 ते 1972 पर्यंत हिंदुस्थानी वन्य जीवांच्या या अंधकाराच्या कचाटय़ात चित्ता प्राणी अडकला. तब्बल वीस वर्षे हिंदुस्थानी वन्य प्राण्यांना केवळ मार्गदर्शक तत्त्वांचीच तितकी काय सुरक्षा होती. मात्र तोवर वेळ निघून गेलेली होती. कदाचित त्यावेळी हिंदुस्थानातील चित्ता हिंदुस्थानातच सहज स्थिरावू शकला असता तर आजचे चित्र वेगळे असते. मात्र चित्त्यांना त्यावेळी कुणी वाली नसल्याने चित्त्यांवर नामशेष होण्याची वेळ आली. काळवीटांची नैसर्गिक संख्या नियंत्रण प्रणाली आम्ही संपवून टाकल्याने पीक नुकसानीमुळे त्रस्त आहोत. नियोजनाचा अभाव व आपल्याच धुंदीत जगण्याची ही मानवी प्रवृत्ती विनाशाकडे जाणारी आहे.

एकीकडे हिंदुस्थान स्वतंत्र झाला तर दुसरीकडे शेवटचा चित्ता हिंदुस्थानात मारला गेला. मात्र त्याच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तब्बल 75 वर्षांनी आफ्रिका खंडातील नामिबियामधील चित्ता मध्य प्रदेशातील कुनो जंगलात पुनर्स्थापित करण्याच्या प्रकल्पाला वेग आलाय. हिंदुस्थानातील आशियाई प्रजातींचा चित्ता आधी आपण संपवला आणि आता आफ्रिकन चित्ता हिंदुस्थानात स्थिरावण्याचे दिवास्वप्न आपण पाहतोय. हे म्हणजे घरची संपत्ती उघडय़ावर ठेवून ती संपवायची आणि मग शेजाऱयाकडे जाऊन मागणी करायची. करोडो रुपये खर्च करून उसना किंवा विकत आनलेला चित्ता पुनर्स्थापित करणं वाटतं तितपं सोपंही नाही. यावर शास्त्र्ाज्ञांनी अभ्यास केला आहेच, पण यातही दोन मतप्रवाह आहे. नामिबियातून आयात केले जाणारे आफ्रिकन प्रजातीचे चित्ते आपण आणून करायचे काय? आफ्रिकन चित्ता आपल्याकडे स्थिरावेल का? चित्त्यासाठी लागणारा योग्य अधिवास आपण जपलाय का? असे एक ना अनेक प्रश्न आज यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. सपाट व मैदानी गवताळ प्रदेशात राहणारा चित्ता हा काळवीट, ससे, चिंकारा आदी तृणभक्षी प्राणी खातो. सोळाव्या शतकात अकबराकडे हजारो चित्ते असल्याच्या नोंदी आहेत. त्या चित्त्यांचा उपयोग त्यावेळी काळवीटांची शिकार करण्यासाठी केला जायचा. याच जातकुळीतल्या हिंदुस्थानात आढळणाऱया आशियाई प्रजातीचे केवळ 12 चित्ते आता इराणमध्ये उरले आहेत. म्हणूनच आशियाई प्रजातीचे चित्ते आता हिंदुस्थानी जंगलात कधीच दिसणार नाहीत हे एक भयाण वास्तव आहे. म्हणून हिंदुस्थानने आफ्रिकन चित्ता आयात करायचे ठरवले.

आफ्रिकन चित्ता हिंदुस्थानी जंगलात व इथल्या वातावरणाशी सहज जुळवून घेऊ शकेल यावर काही वन्य जीव तज्ञ ठाम आहेत. मात्र काही वन्य जीव शास्त्र्ाज्ञांच्या मते ही उगाच केलेली खटाटोप आहे. चित्ता हिंदुस्थानात पुनर्स्थापित कराण्याची कल्पना सर्वप्रथम रणजितसिंह यांनी सन 1972 मध्ये मांडली. त्यादरम्यान इराण देशात तब्बल 300 आशियाई चित्ते शिल्लक होते. आपल्याकडील सिंहाच्या बदल्यात आशियाई चित्ते हिंदुस्थानात आणण्याचा त्यांचा विचार होता. त्यांचे ते स्वप्न स्वप्नच राहिले. यासाठी मध्य प्रदेशातील कुनोलगत असलेल्या 24 गावांचं पुनर्वसन करण्यात आल्यानंतर ते वन क्षेत्र कुनो संरक्षित जंगलाला जोडण्यात आली. गीरमधील सिंहांना कुनोमध्ये कृत्रिमरीत्या स्थलांतरित करायचा पर्याय समोर आला. मात्र गुजरात राज्य आशियाई सिंहांवरील त्यांची मालकी सोडण्यास तयार झाले नसल्याने सिंहाचा विषयसुद्धा तिथे बारगळला. वेगळाच प्रश्न कुनो जंगलासमोर उभा राहिला. सिंहासाठी स्थलांतरित केलेल्या गावांमध्ये सिंह तर येत नाहीत. त्यामुळे स्थलांतरित केलेल्या लोकांना आम्ही परत इथे आणतो अशी वेगळीच भूमिका मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मांडली. हिंदुस्थानात गवताळ कुरणे व माळरानांबद्दल असलेल्या बेफिकिरीमुळे ती आधीच प्रचंड संकटात सापडली. त्यामुळे अनेक गवताळ अधिवास नष्ट झाले आहेत. म्हणून कुनोमधील अधिवास पुन्हा नष्ट होऊ नये यासाठी येथे चित्ता पुनर्स्थापित करण्याचा विचार पुढे आला. कुनो वनक्षेत्रात सिंह येतील तेव्हा येतील. मात्र तोपर्यंत इथे चित्ते आणले जावेत असे मत पुढे आले. यासाठी नामिबियातून चित्ते आणण्यासाठी कायदेशीर व पर्यावरणीय बाजू तपासली गेली. यासाठी सन 2009 मध्ये वन्य जीव क्षेत्रातील तज्ञांची व भारतीय वन सेवेतील अधिकाऱयांची दोन दिवसांची कार्यशाळा राजस्थानमध्ये संपन्न झाली. त्यानंतर यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून सन 2011 मध्ये नामिबियाच्या प्रसिद्ध चित्ता अभ्यासक श्रीमती लॉरी मार्कर यांनी कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. हा गवताळ प्रदेश व खाद्याची घनता पाहून त्या समाधानी झाल्या. कुनो राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ व अधिवास लक्षात घेता तिथे 25 ते 30 चित्ते विसावू शकतात असे त्यांना वाटते.

गवती कुरणे, पठारी व सखल भाग असलेल्या अधिवासात राहणारे प्राणी, पक्षी, सरिसृपासह अनेक प्रजाती हिंदुस्थानातून नष्ट झाल्या, तर काही अखेरच्या घटका मोजत आहेत. जंगली गाढव, लांडगा, वाळवंटी कोल्हा या प्राण्यांसह माळढोक, तणमोर हे पक्षी बोटांवर मोजण्याइतके शिल्लक राहिले आहेत. आयात केलेला चित्ता हिंदुस्थानात स्थिरावेल की नाही याबाबत आजही अनेक शंका आहेत. ‘चारो खाने चीत’ या हिंदी म्हणीप्रमाणे चित्ता हिंदुस्थानात चीत होईल की स्थिरावेल, हे येणारा काळ ठरवेल. मात्र चित्त्याच्या निमित्ताने का होईना, हिंदुस्थानातील माळरानांच्या संवर्धनाचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय. माळरानांच्या संवर्धनाचे दिवास्वप्न पाहायला कुणालाही आवडेल. मात्र भयाण वास्तवाचे चटके सहन करण्याची तयारी आम्ही ठेवली पाहिजे. आशा करू या की, चित्ता हिंदुस्थानात स्थिरावेल, कुणीतरी येईल व जादूची कांडी फिरवेल आणि हिंदुस्थानी माळरानांचे संवर्धन होईल. इतपंच आपल्या हाती आहे.

(लेखक महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळाचे सदस्य आहेत)
 [email protected]