फर्स्ट टेक – रंगभूमीच पहिलं प्रेम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वरा सावंत <<

सोशल सर्विस लीग या शाळेत शिकत असताना आठवीत पहिल्यांदा नाटक काय तंत्र असतं हे जवळून पाहिलं. ते इतपं आवडलं की, भविष्यात रंगमंचावर झाडू मारावा लागला तरी चालेल, पण रंगभूमीपासून कधीही दूर जाणार नाही असा पणच केला. आंतर महाविद्यालयीन स्पर्धा, सिनेमे आणि सीरिअलच्या माध्यमातून अभिनेता म्हणून डेव्हलप झालो असलो तरी रंगभूमीच आपलं पहिलं प्रेम असल्याचं अभिनेता अतुल आगलावे सांगतो. सध्या कलर्स वाहिनीवरील ‘जयजय शंकर महाराज’मधून प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम हे रंगभूमीच्या सेवेचं फळ असल्याचं त्याचं मानणं आहे.

मूळचा ठाण्याचा असलो तरी मुंबईनं मला घडवलं. शिवडीला आजोबांकडे राहताना शाळेतल्या स्नेहसंमेलनातून नाटकाची गोडी लागली. सुरुवातीला विंगेतल्या गर्दीत उभा असलेला मी दर्दी कलाकार माझ्या वक्तृत्व काwशल्यामुळे लीड अभिनेत्याला रिप्लेस करून गेलो. वारसा… प्रल्हाद कुरतडकर लिखित शाळेतलं पहिलं नाटक… समोर प्रेक्षक पाहून पोटात आलेला गोळा, विंगेतूनच पळून जाऊ का, असे येणारे विचार आणि कुणीतरी ढकलल्यासारखी घेतलेली एण्ट्री आजही डोळ्यासमोर कायम आहे. नाटक, सिनेमा आणि सीरिअल तिन्हीचं टेक्निक वेगळं वेगळं. माझी पहिली सीरिअल करताना अभिनयाच्या बाबतीत कोणतंही दडपण नव्हतं. पण या इंडस्ट्रीला तिचा वेग आहे. चिट शॉट्स, पॅरेक्टर करताना सुरुवातीला थोडी तारांबळ झाली. ती प्रत्येकाची होते, दिग्दर्शकाला हे माहीत असतं. त्यामुळे ते आणि टीम आपल्याकडून बरोबर काम करवून घेतात. महाविद्यालयीन स्पर्धा, करंडक, वारसा, आम्ही का तिसरे या सिनेमांच्या ट्रायलमधून मला पहिली सीरिअल ‘लज्जा’ मिळाली आणि मग पुढे 9 सिनेमे, सीरिअलच्या कामाचा सपाटा सुरू झाला. जयजय शंकर महाराज या मालिकेतून प्रेक्षकांची दाद मिळाल्याने कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं.

मित्र, सहकाऱयांचं विशेष प्रेम
उल्हासनगरच्या सीएचएम कॉलेजने दिलेल्या संधीनं करंडक ट्रॉफी खेचून आणली. या दरम्यान कॉलेजच्या तसेच या क्षेत्रात जोडलेल्या मित्रांचा खूप सपोर्ट मिळाला. कॉर्पोरेटमध्ये काम करताना तर सहकारी आणि त्यावेळचे बॉस मला ऑडिशनला स्पर्धेला जायचं असेल तर शेडय़ुल माझ्याप्रमाणे करायचे. ही मदत त्यावेळी माझ्यासाठी खूप मोठी होती.
प्रयोगशील व्हा!
या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱयांनी स्वतःला कायम प्रयोगशील राहण्याकडे भर द्या. स्वतःला शोधा, रोज काही ना काही नवीन सापडेल. व्हिजन क्लिअर ठेवा. जे नाही त्याचा आटापिटा नको, पण जे आहे ते कसं आणखी चमकेल यासाठी प्रयत्न करा. शेवटी आपलं नशीब आपल्याच हातात असतं.

आजी-आजोबा, काकाचं पाठबळ
लहानपणी माझ्या अभिनयहट्टाला पाठबळ मिळालं ते माझ्या आजी-आजोबांमुळे. वक्तृत्व सुधारण्यासाठी काका खूप पुस्तके आणून द्यायचा. त्यामुळेच पाया भक्कम होत गेला. मी जोपर्यंत सीरिअलमध्ये दिसत नाही तोपर्यंत आईबाबा माझ्या कामाबद्दल साशंक होते. आजी-आजोबांच्या विश्वासामुळं मी आज ठामपणे उभा आहे.

n अभिनय क्षेत्रात करीअर करायचं होतं, पण मध्यमवर्गीय घरातून आलेला मी. यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट कुठून करणार होतो. सुरुवातीला या क्षेत्रात जोडलं राहण्यासाठी मी नाटकांना लाईट्स आणि म्युझिक देण्याचं काम स्वीकारलं. यासाठी मी एकेकाळी मुलुंडच्या कालिदास नाटय़गृहात डोअर कीपिंगचं कामही केलं, हेतू एकच होता, रंगभूमीशी नाळ जोडली राहण्याचा.