
पुणे शहरात झालेल्या तुफान पावसामुळे चंदनगर पोलीस ठाणे आणि बालगंधर्व चौकीत एक फुटापर्यंत पाणी साचले होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी स्वतः पाणी बाहेर काढल्यामुळे महत्वाची कागदपत्रे भिजली नाहीत. परिसरात मोठ्या प्रमाणात पाउस झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट चंदनगर पोलीस ठाण्यासह बालगंधर्व चौकीत शिरले होते. मात्र, ड्युटीवर असलेल्या अमलदारांनी तातडीने पाणी बाहेर काढून स्वच्छता केली.
पावसामुळे चंदनगर पोलीस ठाण्यात एक ते दीड फुटापर्यंत पाणी शिरले होते. मागील काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळेही पाणी ठाण्यात शिरले होते. त्याशिवाय डेक्कन पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या बालगंधर्व चौकीत रविवारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पाणी शिरले होते. अर्ध्या तासानंतर कर्मचाऱ्यांनी पाणी बाहेर काढून बालगंधर्व चौकीत स्वच्छता केली. पोलिसांनी केलेल्या तत्परतेमुळे नुकसान झाले नाही.
ठिकठिकाणी वाहतूक संथगतीने
रविवारी संध्याकाळी साडेचार वाजेनंतर शहरातील विविध भागात मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे गणपती विसर्जननंतर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली होती. त्याशिवाय शहरातील काही ठिकाणाचे सिग्नल यंत्रणाही बंद पडली होती. त्यामुळे परिसरातील वाहतूक संथगतीने सुरू होती. मात्र, सुटीचा दिवस असल्यामुळे खरेदीसाठी आलेल्यांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले.




























































