
संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे असलेल्या माखजन बसस्थानाकाची दुर्दशा झाली असून सध्या सगळ्या सोयी सुविधांचे तीन तेरा वाजले आहेत. सोयी सुविधांचा अनास्थेमुळे सध्या प्रवासी देखील कंटाळले आहेत. पूर्वी माखजन बस स्थानक गजबजलेलं असायचं. शिवाय सोयी सुविधा देखील बऱ्यापैकी असल्याने प्रवासी हक्काने स्थानकात येत असत .पण गत 15 वर्षात या बस्थानकातील एक एक सोयी सुविधा बंद पडल्या.
माखजन बसस्थानाकाचा परिसर पूर्णतः खड्डेमय असून, सगळे खड्डे चिखल पाण्यानी भरलेले आहेत. शिवाय एका वेळी अनेक एस टी बसेस आल्या तर त्या उभ्या कुठे करायच्या असा प्रश्न चालकांना पडत आहे. येथील उपहारगृह बंद स्थितीत आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही, दुर्गंधी युक्त अस्वच्छ शौचालये, काळवंडलेल्या भिंती आदी अनेक पायाभूत सोयी सुविधांची वानवा असलेली पहायला मिळत आहे.
अशा अनेक कारणांमुळे प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत . ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या एस टी महामंडळाला माखजन बस स्थानकातील सोयी सुविधांचा विसर पडला की काय? असा सवाल येथील प्रवासी करीत आहेत. प्रवाशांचा ओघ घटल्याने परिणामी मुंबई सारख्या बससेवा बंद झाल्या आहेत. एकेकाळी माखजन बस स्थानकातून मुंबईला जाण्यासाठी आरक्षणासाठी रांगा लावाव्या लागत असत. आरक्षण फुलचे फलक झळकत असत. पण याच बसस्थानाकाला एस टी महामंडळाच्या बेजबाबदार कामामुळे वाईट दिवस पाहावे लागत आहेत.
कोरोनाच्या काळात माखजन बसस्थानाकातून ये जा करणाऱ्या एसटी फेऱ्या ज्या बंद झाल्या त्या अद्याप चालू करण्यात देवरुख आगराला यश आलेले नाही. यामुळे शाळकरी मुलांसह बाजाराला, दवाखान्यात येणाऱ्या नागरिकांची फरपट होत आहे. खर तर माखजन पंचक्रोशीला रेल्वे स्टेशन सरासरी 15 किमी अंतरावर आहे. काही गावांना ते 20हुन अधिक किलोमीटर दूर आहे. त्यामुळे करजुवे-मुंबई ही बस सेवा चांगली चालत असे. परंतु आकारण्यात येणारे तिकीट आणि मिळणाऱ्या सोयी सुविधा याचा कुठेच ताळमेळ बसत नसल्याने प्रवाशांनी पाठ फिरवायला सुरवात केली. सध्या माखजन बसस्थानाकाचा वापर खासगी गाड्यांचे वाहनतळाप्रमाणे होत आहे. याकडे देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. माखजन बस स्थानकाची तत्काळ डागडुजी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांमधून केली जात आहे.



























































