अक्षय कुमारची ‘ती’ जाहिरात हुंडा प्रथेला प्रोत्साहन देणारी, नेटकऱ्यांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी अभिनेता अक्षय कुमारच्या मदतीने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र केंद्र सरकारची ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून रस्ता सुरक्षेवर आधारित जाहिरात शेअर केली आहे. या जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार दिसत आहे. मात्र नितीन गडकरींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या जाहिरातीवर जोरदार टीका होत आहे.

सरकारने 6 एअरबॅगबद्दल लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी अक्षय कुमारसोबत एक जाहिरात केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून ही जाहिरात शेअर करताना नितीन गडकरींनी लिहिले की, ‘6 एअरबॅगसह वाहनात प्रवास करून जीवन सुरक्षित करा.’ या जाहिरातीत अक्षय कुमार एका ट्रॅफिक पोलिसाच्या भूमिकेत आहे. एका मुलीच्या लग्नानंतर ती पतीसोबत सासरी चालल्याचे या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे. ज्यामध्ये मुलगी तिच्या वडिलांनी भेट दिलेल्या कारमध्ये बसून रडत आहे. यावेळी अक्षय कुमार मुलीच्या वडिलांना सांगतो की या कारमध्ये 6 एअरबॅग नाहीत. अशा स्थितीत मुलगी रडणार नाही तर हसणार का? यानंतर वडील तिला 6 एअरबॅग असलेली कार भेट देतात आणि मुलगी हसायला लागते. या जाहिरातत ग्राफिकच्या मदतीने अपघाताच्या वेळी 6 एअरबॅग्जचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले आहे.

जनजागृतीसाठी बनवलेली ही जाहिरात हुंडा प्रथेला प्रोत्साहन देत असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर अनेक जण या जाहिरातीवर जोरदार टीका करत आहेत आणि नितीन गडकरी यांच्यावर हुंडा प्रथेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत आहेत. जाहिरातीत दाखवण्यात आले आहे की, मुलगी तिच्या माहेरच्या घरातून 2 एअरबॅग असलेली कार घेऊन जात आहे. यावेळी अक्षय मुलीच्या वडिलांना 6 एअरबॅग असलेले वाहन घेण्यासाठी दबाव टाकताना दिसत आहे. त्यामुळे या व्हिडीओत मुलीच्या वडिलांवर हुंड्याचा दबाव असल्याचे बोलले जात आहे.

या जाहिरातीवर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, ‘हुंड्यासारख्या वाईट आणि गुन्हेगारी कृत्याला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातीला मान्यता कोण देते. कारच्या सुरक्षिततेचा प्रचार करण्यासाठी सरकार पैसे खर्च करत आहे की या जाहिरातीद्वारे हुंड्याच्या वाईट आणि गुन्हेगारी कृत्याला चालना देत आहे? हे अत्यंत वाईट आहे, केंद्र सरकारकडून हुंड्याला अधिकृतपणे प्रोत्साहन दिले जात आहे’.

एका युजरने या जाहिरातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले आहे की, सरकार कारच्या सुरक्षेबद्दल इतर कोणत्या मार्गाने बोलू शकत नव्हते का? सरकार हुंड्यासारख्या दंडनीय गुन्ह्याचा प्रचार करणारी जाहिरात प्रसारित करण्यासाठी करदात्यांचे पैसे खर्च करत आहे’.