
मागील 12 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर 2023 अखेर पूर्णत्वास जाईल अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधिमंडळात नुकतीच केली आहे, पण रखडलेली कामे, अर्थवट अवस्थेतील पूल, कामाची संथ गती आणि त्यातच पावसाचा फटका यामुळे हा महामार्ग पूर्णत्वास जाण्यास किमान दीड ते दोन वर्षे नक्कीच लागतील, असे चित्र या मार्गावरून प्रवास केल्यावर दिसून येते.
रायगड जिह्यापासून मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेला सुरुवात होते. रोहा-नागोठणे सिंगल रोड आहे. जिंदाल कंपनीसमोर तर संपूर्ण रस्ताच खड्डय़ात आहे. खड्डय़ांमध्ये रस्ता शोधावा लागतो. खामगावात जागोजागी पुलाची कामे अर्थवट बंद पडली आहेत. कोलाडसारख्या महत्त्वाच्या गावातही रस्ते खराब आहेत. तळवलीमध्ये पुलाचे बांधकाम अर्थवट पडले आहे. पुलाच्या ब्लॉक्सवर जंगल वाढले आहे. अनेक महिन्यांपासून या भागात रस्ता रुंदीकरणाच्या कामाला हात लावलेला दिसत नाही.
इंदापूर मार्केट व डेपोच्या बाहेर अत्यंत अरुंद रस्ता आहे. इंदापूरमध्ये तर रुंदीकरणाचा पत्ताच नाही, पण जुना रस्ता असूनही डांबरी रस्ता चांगला आहे. पण इंदापूर सोडल्यावर पुन्हा सिमेंटचा रस्ता आहे. माणगावमध्ये रस्ते रुंदीकरणाचा कोठेही मागसूस दिसत नाही. माणगावमध्येही प्रचंड वाहतूककोंडी. या भागात पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. वीर स्टेशननंतर पुन्हा रस्ता चारपदरी होतो, पण तरीही या भागात पुलाचे काम अर्धवट दिसते. वीर स्टेशननंतर चारपदरी रस्त्यानंतर पुन्हा सिंगल रस्ता आहे. दासगावनंतर पुन्हा चारपदरी मुंबई-गोवा महामार्ग सुरू होतो. दासगावनंतर प्रथमच ताशी 80 किमी वेग मर्यादा दाखवणारा फलक दिसतो.
महाडच्या पुढे रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर तोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता पुन्हा अरुंद होतो. महाड सोडल्यावर टोल नाका लागतो, पण रस्त्याचे काम अर्थवट असल्याने टोल आकारला जात नाही. कशेडी घाटाची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. सुरुवातीला घाटाचा रस्ता चांगला आहे, पण पुढे घाट उतरताना प्रचंड खड्डे आहेत. खड्डे चुकवताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडते. कशेडी घाटात बोगद्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर घाटातील धोकादायक वळण निघून जाईल. खेडकडे जाणारा रस्ता एकदम सुळसुळीत आहे.
चिपळूण खड्डय़ात
चिपळूणमध्ये तर रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. रस्ता दिसतच नाही. सर्वत्र खड्डय़ांचे साम्राज्य आहे. खड्डे चुकवताना मोटारीचा अपघात होण्याची भीती आहे.
पावसाने अधिकच वाईट अवस्था
सध्या कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यांची अवस्था तर अधिकच बिकट झाली आहे. उघडीप मिळत नसल्याने रस्त्यातील खड्डे तात्पुरते बुजवणेही शक्य होणार नाही. राजापूरच्या अलीकडून तळकोकणात जाणारा मुंबई-गोवा महामार्ग मात्र चांगला आहे. या मार्गावरही काही कामे अर्थवट आहेत. रायगड व रत्नागिरी जिह्यात मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था तर अतिशय बिकट आहे. सिंधुदुर्गवासीयांना कोल्हापूरमार्गे तळकोकणात जाण्याचा पर्याय आहे, पण रायगड व रत्नागिरीवासीयांना मुंबई-गोवा महामार्गाशिवाय सध्या तरी पर्याय नाही.
































































