शिंदे गटाच्या नेत्यांच्या यादीत संजय शिरसाट यांना स्थान नाही; नाराजी उफाळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई व ठाण्यातील नऊ विभागप्रमुखांच्या याद्या जाहीर केल्यानंतर आता बंडखोर शिंदे गटाचे नेते व उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पण नेत्यांच्या काय, पण उपनेत्यांच्या यादीतही संजय शिरसाट यांना स्थान दिलेले नाही. यापूर्वी मंत्रीपदाच्या यादीतूनही संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला होता. त्यामुळे नेतेपदही नाही आणि मंत्रीपदही नाही अशी अवस्था संजय शिरसाट यांची झाली आहे. त्यामुळे त्यांची नाराजी उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

नरीमन पॉइंट येथील महिला विकास महामंडळाच्या सभागृहात शिंदे गटाची बैठक झाली. त्यात नेते व उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी शिंदे गटाच्या विभागप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. आता जाहीर केलेल्या नेते व उपनेतेपदाच्या यादीत संजय शिरसाट यांना स्थान देण्यात आलेले नाही. दुसऱया टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या यादीत स्थान देण्याचे गाजर संजय शिरसाट यांना दाखवण्यात आले आहे, पण तूर्तास त्यांची नेते व उपनेतेपदावरही त्यांची वर्णी लागलेली नाही.

शिरसाटांचा मंत्रीपदासाठी थयथयाट

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात संजय शिरसाट यांचे नाव यादीतून अखेरच्या क्षणी बाजूला काढण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ बंगल्यावर पहाटे थयथयाट केला होता. मंत्रीपद न मिळाल्याने शिवीगाळ करीत सर्वांचा पाणउतारा केला होता.

जाहीर नाराजी

मंत्रीपदावर वर्णी न लागल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती अतुल सावे यांना सहकार खाते दिले आहे. त्याचा संदर्भ देत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अतुल सावेंच्या वडिलांसोबत मी काम केले आहे. पण अतुल सावे कधी राजकारणात येतील असे मला वाटले नव्हते. मागून आले आणि कॅबिनेट मंत्री झाले. ‘आज-काल सीनियारिटी काही उरली नाही’ अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी खदखद व्यक्त केली होती.