
>> नामदेव सदावर्ते
आपल्या दैनंदिन जीवनात विविध घटना घडत असतात. सण, उत्सव, सुख-दुःखाच्या या सर्व प्रसंगात आपल्याला ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे स्मरण होणे, हा सहजयोग चिंतन-मननानेच शक्य होतो. आजच्या काळातील वास्तववादी घटना पाहत असताना सुमारे आठशे वर्षांपूर्वी ज्ञानराजांनी लिहून ठेवलेल्या ओव्या आठवतात. आणि त्या त्या प्रसंगाला तंतोतंत जुळतात. प्रसंग अगदी सामान्य असतात. गीतेचे ज्ञान समजून सांगण्यासाठी ज्ञानराजांनी दिलेल्या दृष्टांताच्या ओव्या मनाला स्पर्श करून जातात.
लग्न म्हणजे केवळ वधु-वरच एकत्र येत नाहीत तर ती दोन कुटुंबे स्नेहबंधनात बांधली जातात. अनेक मैलाच्या अंतरावर राहणारी दोन कुटुंबे सोयरिक जुळवितात. त्यासाठी दोन्ही कुटुंबात स्नेह निर्माण व्हावा लागतो. दोनही कुटुंबात जर समजूतदारपणा, दिलदार वृत्ती असेल तरच लग्न जुळते. ज्ञानराज म्हणतात-
रावो तेथे कटक । सौजन्य तेथे सोईरिक ।
वन्ही तेथे दाहक । सामर्थ्य की ।।
हिंदू लग्नपद्धतीत वधु आई-वडिलांचे घर सोडून, माहेर सोडून आपल्या पतीच्या घरी जाते. ज्ञानराज सांगतात-
सांडुनिया कुळे दोन्ही ।
प्रियासी अनुसरे कामिनी ।
तैसी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी । पडली असे ।।
कुणी मोठा अधिकारी, सत्ताधारी आपल्या गावात येणार असल्यास सारेच जण एकत्र येऊन रस्त्यावर सडा-रांगोळ्या घालून सजावट करतात. अनेकदा उत्साहाचे उसने अवसान आणून स्वागत करतात, तसे कर्ज काढून केवळ मोठेपणा दाखविण्यासाठी अनेक लोक विवाह समारंभ थाटात करतात. केवळ लोकांना दाखविण्यासाठी असे करणे योग्य नाही. ज्ञानराज सांगतात-
अधिकारिया रिगता गावो ।
होय जैसा उत्साहो ।
कां रिणावरी विवाहो । विस्तारिला ।।
पूर्वी लग्नाच्या गावी जाण्यासाठी वऱहाडी मंडळी घेऊन बैलगाडय़ाने जात असत. त्या बैलांसाठी चारा, कडबासुद्धा बरोबर नेत असत. कितीही श्रीमंताघरचे लग्न असले तरी बैलांना फक्त चाराच खायला देतील. वऱहाडी लोकांना जसे जिलेबी, लाडू, गुलाबजाम देतात, ते बैलांना देतील काय? ज्ञानराज म्हणतात-
बैल तेथ करबाडे । हे न चुकेचि फुडे ।
नेवो देत की वऱहाडे । समर्थाचिया ।।
लग्न प्रसंगाच्या मंडपात जसे ज्ञानेश्वरीच्या काही ओव्यांचे सहजस्मरण होते, तसेच अचानक तब्येत बिघडल्यावर घरातील सर्वजण घाबरून जातात, एकच धावपळ सुरू झालेली असते. अशा वेळी ज्ञानेश्वरीतील ही ओवी सहज आठवते.
एऱहवी आयुष्याचे सूत्र बिघडतां ।
भूताची उमटे खडाडतां ।
तै न मरतायाही चित्ता । युगान्तु नोहे ।।
आपले आयुष्याचे सूत्र बिघडल्यावर मरणाची भीती मनात निर्माण होते. त्या भीतीमुळे ओव्या आठवणारच नाही. पण मरणाविषयी ज्ञानराज म्हणतात-
धातयाही गेलीया शरण ।
त्रिदोषी न चुके मरण ।
शरीरात कफ, वात व पित्त असते. त्यात असंतुलन निर्माण झाल्यावर शरीरात दोष निर्माण होऊन आपण आजारी पडतो. शरीरास अपायकारक खाणे झाल्यावर पथ्य बिघडते. जर पथ्य पाळले तर शरीरात रोग होणारच नाही. ज्ञानराज सांगतात-
तरी न घालुनि महापुरी ।
न घेपे बुडणयाची शियारी ।
कां रोगु न गणिजे घरी । पथ्याचिया ।।
महापुरात उडीच घेतली नाही तर बुडण्याची भीती वाटणारच नाही. तसेच जर शरीराच्या आरोग्यासाठी आहार-विहाराचे पथ्य पाळले, तर रोग होण्याची भीती राहत नाही. पथ्य पाळले नाही तर रोग होणार आणि रोग झाल्यावर डॉक्टरकडे जावेच लागणार. दवाखान्यात गेल्यावर औषधे घ्यावीच लागतील. तेव्हा दवाखान्याला देऊळ मानावे. डॉक्टरला देव मानावे व औषधाला मित्र मानावे. वैरी मानू नये.
आपले आयुष्य दुःखमुक्त करणारे, संपणारे आयुष्य सुखकर करणारे औषध हे मित्रच मानावे. पण आपली जिव्हा, जिभ त्या औषधाला वैरी मानते. ज्ञानराज म्हणतात-
पाहे पा आयुष्याचा अढळ करी ।
जे सरते जीवित वारी ।
तया औषधाते वैरी । काय जिव्हा न म्हणे ।।
आपली जीभ औषधाला वैरी का मानते? याचे कारण एकच. सारी औषधे, चूर्ण, रस, गोळ्या चवीने फार कडू असतात. कडूपणा जिभेला आवडत नाही. पण आरोग्य हवे असेल
तर कडू औषधे घ्यावी.
की औषधाचिया कडुवटपणी ।
जैसी अमृताचि पुरवणी ।
ते आहाच न दिसे परी गुणी । प्रकट होय ।।
ज्ञानराजही असे म्हणतात-
मितला बोली बोलिजे ।
मितलिया पाऊली चालिजे ।
निद्रेही मानूं दिजे । अवसरे एके ।।
पथ्याबरोबरच माणसाने मनही प्रसन्न ठेवावे. मन प्रसन्न असेल तर शरीरालाही दुःख होत नाही. तहानभूक, रोग, दुःखाची बाधा होत नाही. ज्ञानराज सांगतात-
देखे अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता ।
तेथे रिघणे नाही समस्ता । संसार दुःखा ।।
आपले शरीर अन्नमय आहे. जिवंत राहण्यासाठी अन्न खावेच लागते. अन्न हे ब्रह्मरूप आहे. अन्नरसांच्या सेवनाशिवाय शरीर जिवंत राहणे अशक्य आहे. आपण जे अन्न खातो, ते शरीराला हितकारी असावे. आपण जे अन्न खातो, ते सात्त्विक, पवित्र, सुपक्व, पौष्टिक असावे. सात्त्विक आहार सेवनाने शरीर प्रकृती उत्तम राहते व राजस, तामस, अपथ्यकारी अन्न सेवनाने प्रकृती बिघडते. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे क्षणोक्षणी स्मरण घडत असते. छोटय़ा-छोटय़ा घटनांवेळी ओव्यांमधून मोठी शिकवण मिळते, जगणे कळते.

























































