
कोरोना लॉकडाऊननंतर जनजीवन पूर्ववत झाले आहे. एकीकडे लोकलची रोजची गर्दी 20 लाखांनी कमी झाल्याचे म्हटले जात आहे. एसी लोकलच्या बंद दारांमुळे अपघात कमी होतील असे दावे केले जात असताना लोहमार्ग पोलिसांच्या आकडेवारीने मात्र धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. गेल्या जानेवारी ते ऑगस्ट 2022 या आठ महिन्यांत मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही मार्गावर मिळून धावत्या लोकलमधून पडून तब्बल 415 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी उघडकीस आली आहे. याच काळात तीनही मार्गावर मिळून एकूण 1605 जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे.
उपनगरीय लोकलच्या प्रवासात पूर्वी सकाळी किंवा सायंकाळी गर्दीची वेळ म्हटली जायची, परंतु खासगी नोकरदारांची संख्या मोठी असल्याने आता वेगवेगळय़ा शिफ्टमुळे दुपारचीही लोकलला गर्दी होत असते. लोकलच्या गर्दीमुळे हा प्रवास जीवघेणा ठरत आहे. दारात लटकून प्रवास करणाऱयांमुळे लोकलच्या डब्यात प्रवेश करण्यास मिळत नाही. डब्याच्या आत शिरून अडकून पडण्यापेक्षा दारात उभे राहण्याकडे तरुणांचा कल असतो. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना झालेल्या एकूण 767 मृत्यूनंतर सर्वाधिक बळी धावत्या लोकलमधून पडून झाले असल्याचे म्हटले जाते.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑगस्ट 2019 मध्ये धावत्या लोकलमधून पडून 405 प्रवासी जखमी तर 405 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याच काळात साल 2020 मध्ये लोकलमधून पडून 306 जखमी तर 142 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2021 मध्ये याच काळात 244 जखमी तर 142 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी उघड झाली.
38 महिला प्रवाशांचा मृत्यू
जानेवारी ते ऑगस्ट 2022 मध्ये रूळ ओलांडताना एकूण 767 जणांचा मृत्यू झाला तर 140 जण जखमी झाले असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. गेल्या आठ महिन्यांमध्ये लोकल, मेल-एक्स्प्रेसमधून पडून झालेल्या अपघातातील मृत व जखमींमध्ये पुरुष प्रवाशांची संख्या जास्त आहे. या काळात 642 प्रवासी लोकलमधून पडून जखमी तर 415 जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यात 38 महिला तर 377 पुरुषांचा समावेश आहे.
जानेवारी ते ऑगस्टपर्यंत गेल्या चार वर्षांतील लोकल बळी
साल क्रॉसिंग लोकलमधून पडून आत्महत्या
2019 932 405 22
2020 422 142 10
2021 699 142 42
2022 767 415 45





























































